Balasaheb Thorat
Balasaheb Thorat  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात म्हणाले, पिछेहाटीत काँग्रेस नेतृत्वाचा काही दोष नाही...

आनंद गायकवाड

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - देशातील पाच राज्यांतील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजप व इतर विरोधी पक्षांकडून काँग्रेस पक्ष व त्याच्या नेतृत्त्वावर टीका केली जात आहे. या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिउत्तर दिले. संगमनेरातील एका सामाजिक कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ( Balasaheb Thorat said, there is nothing wrong with the Congress leadership in the defeat ... )

बाळासाहेब थोरात म्हणाले, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्याने काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. याबाबत भाष्य करताना, पाच राज्यात काँग्रेसला पाहिजे तसे यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही त्यामुळे सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यावा, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी राजकारण सोडावे असे म्हणणारे कोण आहेत हे तपासले पाहिजे, असा खुलासाही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, गांधी परिवार म्हणजे काँग्रेसजनांना एकत्र बांधून ठेवणारे, त्याग व बलिदानाची परंपरा असणारे कुटूंब आहे. या पिछेहाटीत काँग्रेस नेतृत्वाचा काही दोष आहे असे मी मानीत नाही. काँग्रेस हा तत्वज्ञान व विचारधारा असलेला पक्ष आहे. दुर्दैवाने जात, धर्म व माणसात भेद करुन सत्तेवर येण्याचा प्रकार वाढला आहे. जगातील अनेक देशात हेच चित्र दिसत असून कट्टरतावाद खुप वाढला आहे. याचा परिणाम काँग्रेसवर होत असला तरी, राज्यघटनेतील मूलतत्वांवर आधारलेले काँग्रेसचे तत्वज्ञान शाश्वत आहे.

राज्यघटना व लोकशाही अबाधित राखण्यासाठी याला पर्याय नाही. हे तत्वज्ञान कदाचित अडचणीत आले असेल. आमच्या कार्यकर्त्यांना आणखी लोकांमध्ये जावून ते समजावून सांगावे लागेल. याला नेतृत्व नाही तर आम्ही कार्यकर्ते कमी पडतो आहे. चिंतन करुन लोकशाही व राज्यघटनेचे महत्व लोकांमध्ये रुजवावे लागणार आहे. अन्यथा काही दिवसांत देश यापासून दूर जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राजकारण विकासाचे व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण कऱणारे असावे. त्यांचे जीवनमान, मुलांचे शिक्षण पुढच्या पिढ्यांची प्रगती यावर देश ताकदवान होतो. या करीता सरकार म्हणून जबाबदारी आहे. दुर्दैवाने 2014 नंतर व्यक्तिद्वेषाचे राजकारण सुरू झाले. सुडाच्या राजकारणासाठी केंद्रीय संस्थांचा वापर सुरू झाला. परिणामी निश्चितपणे गढूळ वातावरण निर्माण झाले ते दूर झाले पाहिजे अशी अपेक्षा थोरातांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT