Radhakrushn Vikhe-Patil- Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरातांच्या घोटाळ्याचा लवकरच भांडाफोड, विखे-पाटलांचा इशारा

संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकऱ्यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर : आगामी हिवाळी अधिवेशनात (Winter session) आपण कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड करणार, असल्याचा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe-Patil) यांनी कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) दिला आहे. काही दिवसांपुर्वीच विखे-पाटलांनी नाव न घेता, नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, असंही म्हटलं होत. एकीकडे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. त्यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखेपाटील यांनीदेखील कॉंग्रेसविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे.

राहुरी तालुक्यात आयोजित एका दूध संघाच्या कार्यक्रमात बोलताना विखेपाटलांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे. " दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते, हे पाहून फडणवीस सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना हे अनुदान न देता दूध संघांनी ते पैसे हडप केले. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकऱ्यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. या आणि अशा अनेक दूध संघांचा नागपूर हिवाळी अधिवेशात आपण पर्दाफाश करणार आहोत,’ असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. त्यांनी संगमनेरमधील दूध संघाचे नाव घेत त्यांनी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवरच निशाणा साधला आहे.

कोरोना महामारी काळात अधिवेशनावर अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडता आले नाहीत. कोरोनाच्या नावाखाली राज्यसरकारने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पुरेसा काळ चालेल अशी अपेक्षा असल्याचे विखे पाटलांनी यावेळी म्हटले आहे. तसेच, दूध संघांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले, या सर्वांचा आपण भांडाफोड करणार असल्याचा इशारा विखे पाटलांनी दिला.

संगरनेरमध्ये एका सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांकडून वर्षभर घेतलेल्या दुधाचेही पैसे कापले आणि नंतर तेच त्यांना परत देत त्यांना अनुदान दिल्याचे सांगितले. दूध संघांचा हा खोटेपणा आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. दूध संघांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करणार असल्याचा इशाराही विखे यांनी थोरात यांना दिला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना विखे- पाटलांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टिकास्त्र डागले आहे. शाहरुख खानचा आर्यन खानच ड्रग्ज प्रकरण आणि त्याचा तपास करणारे बिचाले समीर वानखेडे, गेल्या 25 दिवसांपासून राज्यात हेच सुरु आहे, जसं की देशात, राज्यात आता दुसरे लोकच राहिले नाहीत. आता नवाब मलिकांनी शोधलेली हर्बल तंबाखू शेतकऱ्यांना पुरवावी, यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. राज्यातील कृषी खात्यालाही या वनस्पतीचं बी मिळाले पाहिजे. त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळेल, असा खोचक टोलाही विखे-पाटील यांनी नवाब मलिकांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT