Someshwarnagar, 12 June : बार्शीचे माजी आमदार तथा वैराग येथील भोगावती सहकारी कारखान्याचे संस्थापक संचालक किसनराव नानासाहेब देशमुख (वय 93 वर्षे) यांचे आज निंबूत (ता. बारामती) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
किसनराव (कृष्णराव) देशमुख यांना काँग्रेस पक्षाने १९७२ ते १९७७ या कालावधीत बार्शी पंचायत समितीचे सभापती म्हणून जबाबदारी दिली होती. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी केलेल्या मदतकार्यामुळे ते तालुक्यात लोकप्रिय झाले होते.
बार्शी तालुक्यातील वैराग (तुळशीदासनगर) येथे उभारण्यात आलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक होते. सहकार क्षेत्रावरही त्यांची जबरदस्त पकड होती, त्यामुळेच १९७८ मध्ये आणीबाणीनंतर जनता पक्षाची लाट असतानाही ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून येऊ शकले होते. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेते, आमदार दिलीप सोपल यांच्या निवडणुकांमध्येही देशमुख यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निंबुत येथील सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक (कै.) मुगुटराव काकडे हे त्यांचे व्याही, तर सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे हे त्यांचे जावई होत. तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेही ते जवळचे नातेवाईक होते.
ऐतिहासिक निवडणुकीचा साक्षीदार हरपला
आणीबाणीनंतर जनता पक्षाने काँग्रेसपुढे कडवे आव्हान उभे केले होते. बार्शी मतदारसंघातून १९७८ च्या आमदारकीच्या निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा जनता पक्षाचे उमेदवार होते. काँग्रेसने किसनराव देशमुख यांची लोकप्रियता पाहून त्यांच्यावर निवडणूक लढविण्याची जबाबदारी टाकली होती.
या अटीतटीच्या निवडणुकीत देशमुख यांना 34 हजार 859 तर, सुराणा यांना 29 हजार 067 इतकी मते मिळाली होती, त्या निवडणुकीत देशमुख यांनी 5 हजार 792 मतांनी काँग्रेसचा गड राखला होता. पुढे काँग्रेसला बाजूला ठेवत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षासह 'पुलोद' आघाडी स्थापन झाली. या सरकारमध्ये पन्नालाल सुराणा यांना राज्याचे अर्थमंत्रिपद देऊ केले होते. मात्र, 5 हजार 792 मतांनी पराभूत झालो आहोत, या नैतिक मुद्द्यावर सुराणा यांनी हे पद नम्रपणे नाकारले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.