<div class="paragraphs"><p>Harshada Kakde &amp; Rajashri Ghule&nbsp;&nbsp;</p></div>

Harshada Kakde & Rajashri Ghule  

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेवगावमध्ये श्रेयवादाची लढाई

सचिन सातपुते

शेवगाव ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांची मुदत मार्च अखेरीला संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अवघ्या दोन ते अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेवगाव तालुक्यात तर नवीन वर्षाची सुरवातच श्रेयवादाच्या लढाईने झाली आहे. Battle of Credit in Shevgaon on New Year's Day

शेवगाव तालुक्यातील भगूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नवी इमारत बांधून तयार झाली आहे. या इमारतीच्या उदघाटनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरु झाली आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय धुळवड पहायला मिळाली. या निमित्ताने तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.

भगूर येथे आज (शनिवारी ) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 86 लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते आयोजित केले होते. त्यानुसार अध्यक्षा घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते सकाळी 10 वाजेच्या सुमारास तेथे पोहचले.

यावेळी सरपंच वैभव पुरनाळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी इमारतीसाठी पाठपुरावा करुनही आम्हाला विश्वासात घेतले नाही. तसेच त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केलेल्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे देखील नाव कोनशीलेवर नसल्याने उदघाटन करण्यास विरोध केला.

यावेळी संजय कोळगे यांनी काकडे यांना या कार्यक्रमासाठी फोनवरुन निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व काकडे समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र घुले यांनी इमारतीची पाहणी करुन नारळ फोडत इमारतीचे उदघाटन केले.

यावेळी उध्दव मुरदारे, सौरभ मुरदारे, विकास मुरदारे, रावसाहेब मुरदारे, दादासाहेब मुरदारे, सुनील पाटील, राधाकिसन म्हस्के आदी उपस्थित होते. उदघाटनानंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन कार्यक्रम उरकता घेण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इमारतीस टाळे ठोकले.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या उदघाटनावरुन जिल्हा परिषद अध्यक्षा व सदस्या यांच्यातच श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पहायला मिळाले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्यासाठी चढाओढ सुरु झाल्याचे या निमित्ताने दिसून आले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामांना निधी मंजूर करुन तालुक्याला झुकते माप दिले. त्यामध्ये गटतट व गावांचा विचार न करता ग्रामीण भागातील नागरिकांची सोय पाहिली. मात्र जिल्हा परिषद गटाशी संबंधीत नसलेल्यांकडून कोनशीलेच्या नावावरुन राजकारण केले जात आहे. तालुक्यातील जनतेला काम करणारे कोण व श्रेय घेणारे कोण हे सांगण्याची गरज नाही.

- राजश्री घुले, अध्यक्षा, जिल्हा परिषद, अहमदनगर

स्थानिक ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तीन वर्षापासून पाठपुरावा केला. मात्र पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन करतांना आपल्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विरोध करणे साहजिक आहे.

- हर्षदा काकडे, जिल्हा परिषद सदस्या, अहमदनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT