Bhandardara-Nilwande Water Issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhandardara-Nilwande Water Issue : जायकवाडीचे पाणी; कानडे-धुमाळांमध्ये जुंपली, तर गुजर यांचा संघर्षाचा इशारा

Pradeep Pendhare

Nagar Political News : नगरच्या धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या मुद्द्यावरून नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे प्रणित श्रीरामपूरमधील लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ आणि काँग्रेस आमदार लहू कानडे यांच्यात चांगली जुंपली आहे. यात काँग्रेसचे नगर जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी समन्यायी पाणीवाटपावरून सरकारविरोधात संघर्ष करणार असल्याचे म्हटले आहे.

हिंमतराव धुमाळ यांनी आमदार कानडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "समन्यायी पाणीवाटप कायदा तसेच जायकवाडीसाठी भंडारदरा-निळवंडे धरणांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर आमदार कानडे मौन का बाळगून आहेत. श्रीरामपूर मतदारसंघाच्या हितरक्षणात ते कमी पडत आहेत. समन्यायी पाणीवाटपाबाबत नगर उत्तर जिल्ह्यात तीव्र असंतोष आहे".

श्रीरामपूरच्या वाट्याचे पाणी जायकवाडीला चालले असताना आमदार कानडे कसे गप्प बसू शकतात, असे धुमाळ यांनी म्हटले आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पाटपाण्याच्या हितरक्षणासाठी आता आम्ही मैदानात उतरत आहोत. पुढचा संघर्ष अटळ आहे. 1999 मध्ये आमदारकीची सत्ता बदलली आणि पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला, असेही धुमाळ म्हणाले. (Nagar Water Issue)

आमदार लहू कानडे यांनी जायकवाडीच्या पाणी मुद्द्यावर शेवटी मौन सोडले आहे. 'श्रीरामपूरसह नगर उत्तरमधील शेतकर्‍यांची शेती उद्ध्वस्त करणारा जायकवाडीला पाणी सोडण्याचा आदेश आम्हाला मान्य नाही. पाणी सोडल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. आम्ही या आदेशाला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरू', असा इशारा आमदार कानडे यांनी दिला आहे. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचा हा निर्णय मनमानी पद्धतीने घेतला आहे. नगर जिल्ह्यात दुष्काळ असताना, पाण्याअभावी खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. आता रब्बीचा हंगाम पाण्याअभावी धोक्यात असताना हा निर्णय कसा होऊ शकतो. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यासंदर्भात आकडेवारीसह निवेदन दिल्याचे आमदार कानडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे पीक वाचवण्यासाठी भंडारदरा, निळवंडे धरणातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. रब्बी हंगामासाठी आवर्तनाचे नियोजन गरजेचे आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बारमाही पाणी न देता अन्याय केला जात आहे. याबाबत नियोजन न झाल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारबरोबर संघर्ष हमखास होणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नगर जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT