सातारा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारा चाहतावर्ग मोठा होता यापैकीच साताऱ्यातीस मोहमंद युसुफ (Yusuf Mohmand) हे देखील दीदींचे मोठे चाहते होते. त्यांचे लतादीदींशी असलेल्या ऋणानुबंधांना त्यांनी उजाळा दीला.
गोष्ट १९६८ मधील, मोहमंद युसुफ बाबालाल बागवान यांची. बागवान यांची यादोगोपाळ पेठेत वडिलार्जित बेकरी होती. युसुफभाईंसह इतर लतादीदींच्या गाण्याचे चाहते. मनोरंजनाची इतर साधने नसल्याने कायम रेडिओचा शेजार. यातून लतादीदींना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची ओढ युसुफभाईंना लागली. एक एक रुपया जमवून युसुफभाई साताऱ्यातील सिटी पोस्ट गाठत दीदींच्या पेडररोडवरील घरी ट्रंक कॉल करायचे. त्या भेटायच्या नाहीत. सतत पाच वर्षे दीदींचे घर, ट्रंक कॉल आणि युसुफभाई हे सत्र सुरू होते. एकेदिवशी असाच युसुफभाई यांनी केलेला ट्रंक कॉल उचलला दीदींनी. तेव्हापासून सुरू झालेले दीदी आणि युसुफभाई यांचे संवादसत्र अलीकडे दोन महिन्यांपर्यंत सुरू होते. आज सकाळी ते खंडित झाले, याविषयी ते माहिती देत होते.
गाण्याच्या जोरावर दीदींनी जोडलेल्या कोट्यवधी श्रोत्यांपैकी एकजण युसुफभाई. पिढीजात बेकरी सांभाळतानाच त्यांनी गाण्यांची आवड जोपासली होती. या आवडीतून युसुफभाई दीदींच्या कुटुंबाचाच भाग बनून गेले. केटरिंग व्यवसायात उतरलेल्या युसुफभाईंचा बिर्याणी बनविण्यात हातखंडा. एकेदिवशी आठवण झाल्याने युसुफभाईंनी दीदींच्या घरी फोन लावला. पण, त्या घरी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी दीदींच्या घरी शेजारी असणाऱ्या एका फोनचा क्रमांक दिला.
काही दिवसांनी त्यावर दीदींचा फोन आला. ख्यालीखुशालीच्या व गाण्यांच्या गप्पा झाल्यानंतर दीदींनी विचारले, सध्या काय चाललेय. युसुफभाई म्हणाले, सध्या केटरिंग सुरू केलेय. काय काय करतोस, असे दीदींनी विचारताच युसुफभाई म्हणाले, बिर्याणी व इतर सगळे मांसाहारी पदार्थ. दीदी म्हणाल्या, मी येते एकदा घरी. त्यावेळी युसुफभाईंनी वर्ये येथील एका शेतात आडबाजूला छोटेखानी घर व फोन घेतला. साधारण १९७८ मध्ये दीदींचा फोन आला. त्या म्हणाल्या, युसुफभाई मी पुण्याला येणार आहे, तू ये तिथे. फोनवरील निरोपानुसार युसुफभाई पुण्यातील नेमक्या पत्त्यावर पोचले. धाकधूक होती, भेट होते की नाही याची. पण, भेट झाली. दहा वर्षे फोनवर बोलणाऱ्या दीदींना समोर पाहून युसुफभाई हरखून गेले. यानंतर दीदींनी विचारपूस करत युसुफभाईंना घरी येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दीदी प्रत्यक्ष घरी यायला २००२ मधील नोव्हेंबर महिना उजाडला.
त्या कोल्हापूर येथून पुण्याकडे परतत होत्या. युसुफभाई घरी येतेय...जेवायला. फोन आल्यानंतर युसुफभाईची धांदल उडाली. जेवण तयार झाले आणि युसुफभाई, पत्नी जुलेखा, मुलगा आबिदअली, मुलगी मासूमा यांच्या नजरा दीदींच्या वाटेकडे लागल्या. दुपारच्या सुमारास दीदींच्या वाहनांचा ताफा पोलिसांच्या सुरक्षेत वर्ये येथील रानातील घराजवळ दाखल झाला.
दीदींच्या सोबत बहीण उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि इतर होते. सर्वांनी युसुफभाईंनी बनविलेल्या बिर्याणीवर आडवा हात मारला. जेवण करून दीदी म्हणाल्या, भाई तुझ्या हाताला देवाने चव दिलीय. यानंतर मासुमाने दीदींच्या हातावर मेहंदी रेखाटली. घरगुती आणि गाण्यांवर गप्पा झाल्या आणि वेळ आली निघायची. निघताना दीदींनी जुलेखा यांना बोलावत आणलेली साडी दिली. म्हणाल्या, तुझ्यासाठीच आणलीय. साडी हातात घेतल्यानंतर जुलेखा यांचे डोळे पाणावले. यानंतर युसुफभाईंना घड्याळ भेट देत त्या निघून गेल्या. या दोन्ही वस्तू युसुफभाई आणि जुलेखा यांनी प्राणपणाने जपल्या आहेत. ट्रंक कॉलपासून सुरू झालेला युसुफभाई आणि दीदी यांच्यातील संवाद अलीकडच्या दोन महिन्यांपर्यंत सुरू होता.
ती अन्नदात्री गेली...
त्या गेल्याचे सकाळी कळले आणि युसुफभाईंसह संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते. त्यावर बोलताना शेवटी युसुफभाई एकच म्हणाले, ‘जिच्यामुळे युसुफचा युसुफभाई झाला. जिच्यामुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळाले आणि त्या नावामुळे माझे कुटुंब जगले, ती अन्नदात्री गेली.’
व्यवहार बंदमुठीचा
दीदी पुण्याला आल्यानंतर मला तिकडे बोलावून घ्यायच्या. त्यांना देशी कोंबडा आणि त्याचा रस्सा फार आवडायचा. मी गेलो की, ते करून त्यांना खायला घालायचो. आमच्यात कधी व्यवहार आलाच नाही. निघाताना मी म्हणायचो येतो...त्या म्हणायच्या जा. कधीतरी चार-पाच महिन्यांनी दीदी पुन्हा बोलवायच्या. पुन्हा तेच काम. गप्पा आणि जेवण. जाताना त्या म्हणायच्,या युसुफभाई हे घे. मी नाकारायचो. त्या म्हणायच्या बंद पाकिटातील माझी भेट नाकारू नको.
मैं चूप रहूंगी।
पुण्यातील घरी गेल्यावर गाण्यावर गप्पा व्हायच्या. मला चूप रहूंगी या चित्रपटातील तुम्ही हो माता...तुम्ही पिता हो...गाणे आवडायचे. त्या गाण्याविषयी मी नेहमी बोलायचो. दीदी म्हणाल्या, म्हण गाण. मी हात जोडले आणि डोळे मिटून ते गाणे म्हणालो. त्याला त्यावेळी दीदींनी भरभरून दाद दिल्याचेही यावेळी युसुफभाईंनी सांगितले. हे सांगत असतानाच दीदींनी सांगितल्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि शरद पवारांसारख्या दिग्गजांनी माझ्या हातची चव चाखल्याचा अभिमानही युसुफबार्इंच्या बोलण्यातून जाणवत होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.