Satara Zilla Parishad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : ‘सत्तानाट्यातील मागचं काढू नका’ : भाजपने सुनावताच ‘आमचा आवाज दाबू नका’ म्हणत राष्ट्रवादीचा पलटवार...

BJP Vs Shivsena-NCP : सातारा जिल्हा परिषदेत आघाडी असूनही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी झाली. सदस्यांच्या अभिनंदनावेळी वाद वाढत माफीची मागणी आणि राजकीय तणाव स्पष्ट दिसला.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 18 April : गेली महिनाभरातील घडामोडींमुळे महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कटुता कायम असल्याचे दिसून आले. विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध करत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेतले. पण, सदस्यांच्या अभिनंदनावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांनी ‘तुमच्यामुळे आमचा अपमान झाला आहे, त्यामुळे माफी मागा,’ अशी मागणी करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना टार्गेट केले. सत्तानाट्याच्या घडामोडीतील मागंच काढू नका, असे भाजपच्या सदस्यांनी राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांना सांगतच देसाई यांनी ‘आम्ही अभिनंदन करतोय, आमचा आवाज दाबू नका,’ असे आवाहन केले.

डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची विशेष सभा झाली. सभेला उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण समिती सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती लता कर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेच्या दहा विषय समितींच्या ८३ जागांपैकी ४३ जागा भाजपला, तर ४० जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसला देऊन विषय समिती सदस्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यानंतर अभिनंदन ठरावाच्या वेळी जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना सदस्यांना बोलून न दिल्याने उपाध्यक्ष राजू भोसले यांनी सभा गुंडाळल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रतिसभा घेत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.

निवडीनंतर अध्यक्षा प्रिया शिंदे म्हणाल्या, महायुती म्हणून आपण राज्यात एकत्र असून काही अपवाद वगळता जिल्ह्यात एकत्र येता येईल. जुन्या गोष्टी विसरुन एकत्र येऊन जिल्हा परिषदेचा नावलाैकिक वाढवूया. जिल्ह्यातील चार मंत्री मंत्रिमंडळात असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी मोठा निधी आणू. सदस्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही.

प्रिया शिंदे यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्याबरोबर राहू. मात्र, गेल्या महिनाभरात जिल्हा परिषदेची मोठी मानहानी झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीत जे झाले ते व्हायला नको होते.

तेवढ्यात सत्तानाट्याच्या घडामोडीतील मागचे काही काढू नका असे म्हणत उपाध्यक्ष राजू भोसले आणि भाजप सदस्य दिलीप बाबर यांनी देसाई यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अध्यक्ष प्रिया शिंदे यांनी भाषणास अनुमती दिली.

आम्ही अभिनंदन करतोय, आमचा आवाज दाबू नका, असेही देसाई म्हणाले. शेवटी देसाई यांच्या भाषणावर आक्षेप घेत गटनेते उदय कबुले यांना भाषणाची संधी देण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक होत मत मांडताना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या ऋतुजा शिंदे व लता कर्णे यांना टार्गेट केले. मात्र, उपाध्यक्ष राजू भोसले, वसंतराव मानकुमरे यांनी यावर आक्षेप घेत, हा विषय तुम्हाला मांडता येणार नाही असे सांगत भोसले यांनी आभार मानत सभा संपल्याचे जाहीर केले.

उपाध्यक्ष राजू भोसले यांनी अध्यक्ष प्रिया शिंदे यांचा अधिकार डावलत सभा आटोपती घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. या वेळी प्रतिसभा घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.

माफी मागा; अन्यथा आंदोलन करू

जिल्हा परिषदेची विशेष सभा उपाध्यक्षांनी गुंडाळल्याचा आरोप करत विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दालनात जाऊन त्यांना धारेवर धरले. सभा संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी सभागृहाबाहेर गेले.

यावेळी विरोधी सदस्यांनी प्रतिसभा घेत या घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर विरोधी सदस्य याशनी नागराजन यांच्या दालनात गेले. तुम्ही सभागृह सोडून आल्यामुळे आमचा अवमान झाला असून आपण माफी मागावी. आपण परत सभागृहात यावे; अन्यथा आम्ही याठिकाणी ठिय्या आंदोलन करु ,अशी भूमिका घेतली. अध्यक्षांचा अधिकार असताना उपाध्यक्षांनी सभा कशी आटोपती घेतली, याबाबत आपण प्रशासन म्हणून खुलासा करावा, अशी मागणी केली.

बदलीची धमकी देणं अयोग्य : याशनी नागराजन

सभेबाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हा परिषद अध्यक्षांना असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इतर प्रशासकीय अधिकारी सभेच्या कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाही. सभा बोलावण्याचा व सभेचे कामकाज चालवण्याचा सर्वस्वी अधिकारी अध्यक्षांना आहे. पीठासीन अध्यक्षांनी सभा आटोपती घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकारीही सभास्थळावरुन बाहेर जातात. त्यामुळे सभा संपल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांची बाजू ऐकून घ्यायला हवी होती हे म्हणणे चुकीचे आहे. जो अधिकार मला नाही त्याबाबत मला विचारणे आणि माझ्या बदलीची धमकी देणे योग्य नसल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT