Nagar urban bank
Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अर्बन बँक निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप

Amit Awari

अहमदनगर : आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नगर अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नगर अर्बन बँकेची निवडणूक जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली असून आज या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात अहमदनगरचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी प्रणित सहकार पॅनल विरूद्ध अर्बन बँक बचाव समिती अशी निवडणूक होणार आहे. सहकार पॅनल हा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी यांच्या मुलाच्या तर नगर अर्बन बँक बचाव समिती ही भाजपचे माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर व ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील आहे. BJP against BJP in Nagar Urban Bank elections

गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये या बँकेची निवडणूक अपेक्षित होती. मात्र, बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षांपासून प्रशासकच काम पाहत आहेत. या कालखंडात नगर अर्बन बँक बचाव समिती स्थापन झाली. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणावर बँक बचाव समितीने पाठपुरावा केला होता. त्यामुळे हे प्रकरण प्रकाश झोतात आले होते तसेच बँकेतील संचालक व काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 30 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

बँकेच्या मागील निवडणुकीचा आढावा

बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 48 हजार मतदार होते. माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी व दिवंगत सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल तसेच सुभाष भंडारी व राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनल यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत गांधी व गुंदेचा यांच्या पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळविली होती. आताच्या मतदार यादीत 55 हजार 991 मतदार आहेत. ही वाढलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

सध्याची राजकीय गणिते

नगर अर्बन बँक ज्याच्या ताब्यात तो शहर अथवा जिल्ह्यातील पुढील निवडणुका जिंकणार असे समीकरणच नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळापासून होते. बार्शीकरांचा नगरपालिका व बँक निवडणुकीत पराभव करत दिलीप गांधी यांनी शहर व नंतर जिल्ह्याच्या राजकारणात स्थान मिळविले होते. गांधी पुढे काही काळ केंद्रात मंत्रीही राहिले होते. बँकेतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

डिसेंबर 2018च्या महापालिका निवडणुकीत दिलीप गांधी यांनी पूत्र सुवेंद्र गांधी यांना महापौर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्याच वेळी अॅड. अभय आगरकर यांच्या समर्थकांची तिकीटे कापण्यात आली. या निवडणुकीत सुवेंद्र गांधीचा पराभव झाला. मात्र दिलीप गांधींनी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संग्राम जगताप यांच्याशी जुळवून घेत भाजपचा महापौर केला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे अभय आगरकर निवडून येऊ नये यासाठी जगतापांना मदत केली त्यामुळे जगताप पहिल्यांदा आमदार झाले होते, असा आरोपही दिलीप गांधींवर होत राहिला. दिलीप गांधी यांचे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे निधन झाले.

मागील निवडणुकीत गांधींच्या सहकार पॅनलने सहज विजय मिळविला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत ही स्थिती नाही. सुवेंद्र गांधींना आव्हान देण्यासाठी अॅड. अभय आगरकरच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांची साथ आहे. या पॅनलमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपने तिकीट कापलेल्या माजी नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांचे पती सीए राजेंद्र काळेही निवडणूक लढविणार आहेत. तर सुवेंद्र गांधी यांच्या सहकार पॅनलमध्ये माजी संचालकांचा भरणा आहे. यातील बऱ्याच जणांवर बँकेतील गैरव्यवहाराचा आरोप आहे. सहकार पॅनल निवडणुकीच्या रुपात सभासदांच्या दरबारात कौल मागण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध भाजप असा संघर्ष नगर अर्बन बँक निवडणुकीत दिसणार आहे. यात सुवेंद्र गांधी व अॅड. अभय आगरकर यांच्या अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे.

अवसायनाची टांगती तलवार

नगर अर्बन बँकेत 655 कोटीच्या ठेवी आहेत. त्यात 31 मार्च 2021 नुसार 357 कोटीचा एनपीए होता. तो आता वाढून 402 कोटींचा एनपीए झाला आहे. ही निवडणूक डिसेंबरमध्ये संपेल. तोपर्यंत एनपीए वाढत जाणार आहे. नवीन संचालक मंडळ सत्तेत येईल. या संचालक मंडळाला अवघ्या साडेतीन महिन्यांत एनपीएची 402 कोटींपेक्षाही जास्त रक्कम वसूल करून दाखवावी लागणार आहे, तसे न झाल्यास बँकेवर अवसायनात निघण्याचा धोका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT