Chandrakant Patil
Chandrakant Patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचे विधान केलं आहे. ''महाविकास आघाडी सरकार (Thackeray government)आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल होईल,'' असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ''विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे.''

''जे अपक्ष लोकप्रतिनिधी आहेत, ते देखील भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य जाणता येते. त्यांना महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, याची कल्पना आहे. येणाऱ्या नवीन वर्षात काही दिवसातच महाविकास आघाडी सरकार राज्यातून जाईल. त्यानंतर देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असेल. ही बाब लक्षात घेऊनच अपक्ष उमेदवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे विजयाची मॅजिक फिगर आम्ही पार करूच पण अमोल माणिक मोठ्या फरकाने निवडून येतील,'' असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना विधानपरिषदेवर संधी का दिली जात नाही, असे विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळालं आहे. तसंच पंकजा आणि तावडे यांनाही मिळेल. या वर्षभरात खूप स्कोप आहे, असे विधान पाटील यांनी केले. आम्ही सगळेच संघटनात्मक जबाबदारी आणि निवडणुकीतील संधी यात संघटनेची जबाबदारी जास्त महत्त्वाची मानतो. त्यामुळे तावडे यांना अखिल भारतीय सरचिटणीसपदाची मिळालेली जबाबदारी इतकी मोठी आहे की त्यापुढे त्यांचे दोन वर्षापूर्वी तिकीट कापले गेले हा विषय मागे पडतो, असे पाटील म्हणाले.

''तावडे यांना पक्षात मिळालेली बढती हा माझ्यादृष्टीने व्यक्तिगत आनंदाचा विषय आहे. जे संयम आणि निष्ठा ठेवतात, संधी हुकली तरी पक्षाविरोधात रिअ‍ॅक्ट होत नाहीत त्यांना एक ना एक दिवस संधी ही मिळतेच आणि ती आधीपेक्षा मोठी संधी असते, हे तावडे यांच्याबाबतीत घडलेले आहे,'' असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT