मंगळवेढा (जि. सोलापूर) : गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोपवली आहे. त्या फडणवीसांच्या मदतीला दहा महिन्यांपूर्वी झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देऊन विजयी झालेले भाजपचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांना पक्षाने गोव्याच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरवले आहे. (BJP given responsibility of campaigning in Goa to Mangalveda MLA Samadhan Avtade)
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. या पाच राज्यांत छोटे असलेले; परंतु पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिक उत्पन्नात आघाडीवर असलेल्या गोवा राज्याची निवडणूकदेखील मोठी चुरशीची बनली आहे. या आखाड्यामध्ये उमेदवार निश्चितीवरून मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने गोवा हे राज्य आपल्या ताब्यात कायम ठेवण्याच्या दृष्टीने मोठा चंग बांधला आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी टाकली आहे. फडणवीस यांच्या दमतीला महाराष्ट्रातून मोठी कुमक पुरवली जात आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत धक्कातंत्र देऊन राज्यात चर्चेत आलेले आमदार समाधान आवताडे यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
आमदार आवताडे यांनी कळंगुट विधानसभा मतदारसंघामध्ये कॉर्नर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शक्तिशाली, दूरदृष्टी नेतृत्वातून गोवा राज्याने देशात वेगळी उंची गाठली आहे. धोरणात्मक विकासाचे प्रगतशील तोरण नव्याने बांधण्यासाठी गोवा राज्यातील जनता पुन्हा सज्ज झाली आहे. विधायक कार्य आणि सर्वसामान्य जनता यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल करणाऱ्या भाजपसारख्या सर्वसमावेशक पक्षाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा हे विजयाची नांदी असल्याचा विश्वासही त्यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्त केला आहे. पंढरपूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्कातंत्र देताना कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा हाताळली, याबाबत त्यांनी तिथल्या भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.