Radhakrishna Vikhe Patil felicitation
Radhakrishna Vikhe Patil felicitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप नेते चाचा तनपुरेंना म्हणाले पक्षात या... त्यांनी जोडले हात

विलास कुलकर्णी

Rahuri : "चाचा" भाजपत या.. भाजपचे उपरणे गळ्यात घाला.. असा आग्रह माजी आमदार शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ), खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe ) यांनी केला. परंतु, "मी तुमचाच आहे." असे म्हणत स्मितहास्य करून, हात जोडून "भाजप" प्रवेशापासून चाचांनी दूर राहणे पसंत केले. विखे पिता-पुत्रांसह कर्डिलेंचा आग्रह चाचानी नम्रपणे नाकारला.

राहुरी पालिकेच्या निवडणुकीतील विरोधकांचे नेतृत्व, तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे तथा "चाचा" यांची भाजपात प्रवेश न करण्याची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली.

काल (रविवारी) राहुरी येथे कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. चाचा तनपुरे हेच या सत्कार समारंभाचे मुख्य आयोजक होते. याच सत्कार समारंभात चाचा तनपुरे यांचे भाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी भाजपात प्रवेश केला. उंबरे, वरशिंदे, वरवंडी, गणेगाव येथील पंचवीस-तीस तरुणांनी भाजपाचे उपरणे गळ्यात बांधले.

विशेष म्हणजे, ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. ते चाचा तनपुरे यांनी आजपर्यंत भाजपात प्रवेश केलेला नाही. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदावर राहिलेले चाचा तनपुरे राहुरीचे माजी नगरसेवक व राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक राहिले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा पॅनल तयार होतो. मागील निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चाचा तनपुरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी भाषणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यापुढे भाजपच्या चिन्हावर लढविल्या जातील. स्थानिक आघाड्यांच्या नावावर निवडणूक लढवली जाणार नाही. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व राहुरी नगरपालिकेच्या निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढविली जाईल. असे स्पष्टपणे जाहीर केले.

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाध्यक्ष मुंढे यांचा धागा पकडून, आपल्या भाषणात चाचांना भाजपा प्रवेशाचा आग्रह केला. यापूर्वी विकास मंडळाच्या नावाखाली राहुरी पालिकेची निवडणूक लढविली जात होती. आता भाजपच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. त्यामुळे, भाजपात प्रवेश करा. किती दिवस खाट्या गाईचे दूध काढणार. आता दुभत्या गाईचे दूध काढा. अशा शब्दात कर्डिले यांनी चाचा तनपुरे यांना भाजपचे आमंत्रण दिले.

खासदार डॉ. सुजय-विखे पाटील यांनी चाचा तनपुरे यांना भाजपात येण्याचे आवाहन करून, विधानसभा निवडणुकीतील उलटफेरावर प्रथमच जाहीर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत राहुरी तालुक्यातून सत्तर हजारांचे मताधिक्य असतांना त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राहुरीचे आमदार कर्डिले यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्याचे खापर विखेंवर फोडले जात होते.

याविषयी बोलतांना खासदार विखे पाटील म्हणाले, "नगर जिल्ह्यात फक्त राहुरीच्या मतदारांचे काहीच कळत नाही. माझे आजोबा स्व. खासदार बाळासाहेब विखे-पाटील, वडील नामदार राधाकृष्ण विखे पाटील, स्वतः मला मतदारांचा अंदाज कळला नाही. अगदी मागील निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनाही मतदारांचा अंदाज आला नाही. प्रत्येक निवडणुकीत चारडोकी एकत्र येऊन काहीतरी ठरवितात. त्यांचे हळूहळू चारशे डोके होतात. हळूहळू प्रत्येक गावात लोन पसरते. निवडणुकीची दिशा बदलते. मतदारांना कितीही सांगितले तरी त्यांचे ठरलेले असते. असा राहुरीचा मतदार आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

खासदार डॉ. विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा फटकारले. ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या. त्याचा फटका भाजपा कार्यकर्त्यांना बसला. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. यापुढे दुहेरी निष्ठा चालणार नाही. भाजपा पक्षावर व नेत्यावर कार्यकर्त्यांनी निष्ठा ठेवावी. अशा शब्दात कार्यकर्त्यांना सुनावले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा विजय होईल. यापुढे तेच आमदार असतील. असेही खासदार डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणात यापुढील निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावर होणार आहेत. राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे चाचा तनपुरे यांनी आजच भाजपात प्रवेश करावा. असा आग्रह केला. परंतु, चाचा तनपुरे यांच्या मनात नेमके काय चालले? याचा कुणालाही अंदाज आला नाही. त्यांनी प्रत्येकाला स्मितहास्य करून फक्त हात जोडले. मंत्री विखे पाटील यांना "मी तुमचाच आहे." असे म्हणत गळ्यात भाजपाचे उपरणे घालणे टाळले.

ज्यांनी मंत्री विखे-पाटील यांच्या सत्काराचे नियोजन केले. नवीन कार्यकर्त्यांची भाजपात प्रवेश घडवून आणले. त्यांनी स्वतः मात्र भाजप प्रवेशापासून दूर राहणे पसंत केले. यामुळे कार्यक्रमानंतर चाचा तनपुरे यांच्या गुलदस्त्यातील भूमिकेची सर्वाधिक चर्चा रंगली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT