bjp  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप नेत्यांसाठी पुढील दोन दिवस असणार कसरतीचे!

काही जागांवर ते नक्कीच प्रबळ दावेदारी करू शकतात.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मंगळवारपासून (ता. ९ नोव्हेंबर) दोन दिवस कसरत होणार आहे. एकीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी पॅनेलची रचना, माघार आणि त्याचवेळी जिल्हा परिषदेतील सभापती आणि अध्यक्ष राजीनामा विषय मार्गी लावावा लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते दोन दिवस सांगली येथे मुक्काम ठोकणार आहेत. (BJP leaders stay in Sangli two days for district bank elections & ZP office bearers change)

भारतीय जनता पक्षाने सांगली जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र शेतकरी पॅनेलची घोषणा केली आहे. याआधी भाजपने कधीही जिल्हा बँक स्वतंत्रपणे लढलेले नाही, मात्र या निवडणुकीचा पक्का अनुभव असलेले खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख असे नेते भाजपकडे आहेत. संग्रामसिंह देशमुख यांचाही अनेक गटांत प्रभाव आहे. त्यामुळे काही जागांवर ते नक्कीच प्रबळ दावेदारी करू शकतात. आता नेमका कुठल्या गटात कुणाला संधी द्यायची, कुणी माघारी घ्यायचे, हे मुद्दे कळीचे असतील. त्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत खल होणार आहे.

दुसरीकडे, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे वातावरण आणखी तापत चालले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सभापती यांचा राजीनामा आला आहे, असे पक्षाचे अध्यक्ष सांगत आहेत. ती प्रक्रिया पार पडेपर्यंत सारे अधांतरी आहे, अशीच स्थिती आहे. नेत्यांच्या पत्रकार परिषदेतील घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये तफावत दिसत असल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत या विषयावर बराच खल होणार आहे. नेते तळ ठोकून असल्याने त्याबाबत निर्णायक हालचाली होतील, असे सांगितले जात आहे.

जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले,‘‘ सांगली जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद या दोन महत्त्वाच्या संस्थांतील घडामोडींत दोन दिवस महत्त्वाचे आहेत. त्यादृष्टीने कोअर कमिटी नियोजन करेल. कोणत्याही अडचणींशिवाय आम्ही मार्ग काढत पुढे जावू. पक्षाची ताकद मोठी आहे. ती यानिमित्ताने दाखवली जाईल.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT