Dhananjay Mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik Vs Congress News : 'श्वेतपत्रिकेवर एकाही काँग्रेस नेत्याचे प्रत्युत्तर नाही, याचा अर्थ..' ; धनंजय महाडिकांनी लगावला टोला!

BJP MP Dhananjay Mahadik : शिवराजसिंह चौहान यांची शनिवारी साताऱ्यातील गांधी मैदानावर सभा होणार असल्याचीही माहिती दिली

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara BJP News : 'केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती. याला काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. ही घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट्य कोणीही केलेले नाही. याचा अर्थ विरोधी आघाडीने हे सर्व स्वीकारले आहे, असाच होतो,' अशी टीका भाजपचे कोल्हापूरचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी साताऱ्यात केली.

भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी साताऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, मकरंद देशपांडे, सुनील काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) म्हणाले, 'आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी भाजपचे राष्ट्रीय नेते शिवराजसिंह चौहान यांची साताऱ्यातील गांधी मैदानावर सभा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणार आहे.'

तसेच 'राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनात मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेत्रपत्रिका काढली होती. त्यावर काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यातील आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही. घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट्य काँग्रेसच्या कोणीही केले नाही. याचा अर्थ विरोधी आघाडीने ही श्वेतपत्रिकेतील घोटाळे स्वीकारले आहेत, असे दिसते.'

याशिवाय 'गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली. गरिबी हटावचा नारा काँग्रेसला पूर्ण करता आला नाही. पण, मोदी सरकारने दहा वर्षांत गरिबी हटवून 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर आणले आहे,' असंही म्हणाले आहेत.

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार कधी निश्चित होतील, यावर महाडिक म्हणाले, 'भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे. आपले राजकीय भवितव्य पाहून अनेकजण भाजपमध्ये येत आहेत. पक्षात येण्याचा ओघ वाढला आहे.'

तर सध्या महागाई वाढली असून, जनतेत नाराजी पसरली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्ही जनतेपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार या प्रश्नावर महाडिक म्हणाले, 'महागाई वाढलेली नाही, ती नियंत्रणात आहे. 80 टक्के लोकांना रेशन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. लसूण 400 रुपये किलो झाला तरी शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत,' तर 24 फेब्रुवारीच्या मेळाव्यास जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT