Solapur, 17 October : भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किती स्वाभिमानाने देशहिताचे काम करतो, याचं सर्टिफिकेट कुणी ऐऱ्यागैऱ्यांनी देण्याची गरज नाही. भाजप देशहिताने प्रेरित झालेला पक्ष आहे, त्यामुळे कोणी काही म्हटलं तर त्याला अधिकच महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी खासदार शिंदे यांनी केलेल्या आरोपाला गोरे यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, दहशतवाद तयार करण्याच्या विचारसरणीचे अनुकरण काँग्रेस, सीजेपी करत आहे. बांगलादेशमध्ये कसा विद्रोह झाला, त्याचे उदाहरण ते लोक देत आहेत. ज्यांची विचारसरणी बांगलादेशमध्ये झालेला विद्रोहावर आहे ते आता पुढे चालले आहेत.
मतदारांशी संपर्क करण्यासंदर्भात या मेळाव्यात चर्चा झाली. संपर्कसाठीची रणनीती आजच्या बैठकीत ठरली, मतदारापर्यंत पोहोचण्याविषयी चर्चा झाली. शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी एकनाथ शिंदे असं म्हटलं आहेत की, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. त्यामुळे पुणे मतदारसंघात स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे विजयी होतील, असा दावाही गोरे यांनी केला.
पालकमंत्री म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य ऐकले तर लक्षात येईल की महायुतीचे पाचही उमेदवार निवडून येतील, असे ते म्हणाले. शिक्षक आणि पदवीधरचे सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येतील. आमचं संघटन प्रचंड ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल आणि निवडणूक जिंकेल.
आम्ही आमच्या ताकदीवर यश मिळवू शकत नाही, हे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला आहे. रोहित पवार काय म्हणतात, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. अर्थखातं हा महायुतीत आमचा अंतर्गत विषय आहे, त्यांनी त्यात नाक खुपसून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझी त्यांना विनंती आहे की, आता निवडणूक लागली थोडी ताकद लावा, असा सल्लाही त्यांनी रोहित पवारांना दिला.
सुषमा अंधारे यांच्या आरोपाला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतिहासातील सर्वात मोठी पोलिस भरती झाली. या भरतीवर एकही डाग लागलेला नाही. जिथे आरोप होता तिथे चौकशी केली जाते. मात्र तरीही चौकशी करण्याची मागणी होत असेल तर ते उचित नाही.