सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीत भाजपने स्वबळावर उमेदवारी जाहीर केली असली तरी अनेक ठिकाणी आयात नेत्यांना प्रमुख जागा देऊन तडजोड केल्याचे चित्र दिसत आहे.
अकलूज, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा आदी ठिकाणी स्थानिक निष्ठावंत, आयात नेते आणि विशिष्ट सामाजिक समीकरणांच्या आधारे उमेदवार निवडले गेले आहेत.
काही ठिकाणी घराणेशाही, निष्ठावंतांना प्राधान्य, ओबीसी कार्ड अशा राजकीय समीकरणांचा वापर करीत भाजपने स्वबळाची रणनीती राबविली आहे.
Solapur, 17 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीची निवडणूक भाजपने स्वबळावर निर्धार करत सर्वच ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. अकलूजमध्ये माेहिते पाटील यांना वगळून माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. अकलूजमध्ये पूजा कोथमिरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसरीकडे अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांचे भाऊ मिलन कल्याणशेट्टींना, तर मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रतिनिधीच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे भाजपने स्वबळाचा नारा खरा केला. मात्र, अनेक ठिकाणी आयात नेत्यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ टाकली आहे.
सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये आणलेल्या मारुती बनकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. बनकर यांच्या भाजप (BJP) प्रवेशासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सांगोल्यात आले होते. त्यांना एबी फॉर्म दिल्यानंतर गोरे हे नियोजित दौऱ्यावर गेले. मात्र, स्वबळाच्या अट्टाहासाठी भाजपकडून अनेक ठिकाणी तडजोडी आणि फोडाफोड करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूरमधून (Pandharpur) माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निष्ठावंत असणारे लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामल शिरसट यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूरमधून माजी नगराध्यक्ष साधना भोसले ह्या भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नागेश भोसले यांनी परिचारकांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे परिचारकांनी भोसले यांच्या ऐवजी निष्ठावंत असणारे लक्ष्मण शिरसट यांना उमेदवारी दिली आहे.
खुली जागा असताना प्रशांत परिचारक यांनी ओबीसी कार्ड खेळत श्यामल शिरसट यांना रिंगणात उतरवले आहे. लक्ष्मण सिरसट स्वतः हे पंढरपूरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच मागील पंचवार्षिकमध्ये त्यांचा मुलगा विक्रम सिरसट हा नगरसेवक होता. त्यामुळे परिचारक यांच्याकडून पंढरपुरात ओबीसी कार्ड खेळत निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान राज्य प्रतिनिधी अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी जगताप यांचे काम आहे, त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादी नेत्याच्या घरात उमेदवारी द्यावी लागली आहे. अकलूजमध्ये मोहिते पाटील यांना वगळून माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखालील भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. त्या ठिकाणी भाजपने पूजा कोथमिरे यांना उमेदवारी दिली आहे.
करमाळ्यातही नुकतेच भाजपवासी झालेले कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना उमेदवारी दिली आहे. कन्हैयालाल देवी हे नगरसेवक होते. तसेच, सुनीता देवी यांचे सासरे गिरधरदास देवी हे २७ वर्षे करमाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यामुळे भाजपकडून देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी विलासराव घुमरे यांच्या पत्नीला भाजपकडून डावलण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
पंढरपूर : श्यामल लक्ष्मण सिरसट
सांगोला : मारुती बनकर (शेकापचे नेते, भाजपमध्ये प्रवेश)
अकलूज : पूजा कोतमिरे (भाजपचे निष्ठावंत)
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी
मैदर्गी : अंजलीताई बाजारमठ
दुधनी : अतुल मेळकुंदे
मोहोळ : शीतल क्षीरसागर
कुर्डूवाडी : माधवी नितीन गोरे
मंगळेवढा : सुप्रिया जगताप (अजित जगताप राष्ट्रवादी काँग्रेस राज्य प्रतिनिधी)
करमाळा : सुनीता देवी (कन्हैयालाल देवी यांची पत्नी)
बार्शी : तेजस्विनी प्रशांत कथले
अनगर (नगरपंचायत) : प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील
1. सोलापूर जिल्ह्यात भाजपने किती ठिकाणी उमेदवार जाहीर केले?
भाजपने 11 नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीत उमेदवार जाहीर केले.
2. अकलूजमध्ये भाजपची उमेदवार कोण आहे?
अकलूजमध्ये पूजा कोथमिरे या भाजपच्या उमेदवार आहेत.
3. पंढरपूरमध्ये भाजपने कोणाला उमेदवारी दिली?
पंढरपूरमध्ये श्यामल शिरसट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4. करमाळ्यात भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवार कोण आहेत?
करमाळ्यात सुनीता देवी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.