Uday Samant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant : कर्जवसुलीसाठी बॅंका त्रास देत असतील तर मला फोन लावा : उद्योगमंत्र्यांचा सल्ला

Eduction Loan Recovery Issue : सोलापूर जिल्ह्यातील 11 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण कर्जासाठी बँकांकडून सक्ती किंवा त्रास होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले.

विश्वभूषण लिमये

Solapur, 06 October : सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झालेला आहे. या 11 तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ करायची आहे. मुलांच्या शिक्षणाच्या कर्जावर सक्ती होऊ नये, जर बँकांचे लोक त्रास देत असतील तर त्यावेळी मला फोन लावा, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्याने फक्त सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा दिला नाही, तर सर्वांत जुना शिलालेख सोलापुरातील आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा 182 वर्षे अगोदर तो शिलालेख लिहिला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना मी या विद्यार्थ्यांचा देव माणूस होतो. कारण तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारलं की, कोरोना काळात परीक्षा घ्याव्यात का, तेव्हा त्यांनी परीक्षा घ्या म्हणून सांगितले. तेव्हा माझे कोणी ऐकलं नाही, मी फेसबुक लाईव्ह आलो आणि परीक्षा रद्द होणार, असं जाहीर केलं. परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण मंत्री देव माणूस होतो, हे पहिल्यांदा मला ठाऊक झालं. मी असं 2 वर्षे केलं. कारण त्यावेळचा काळ वेगळा होता.

आता त्यावेळचे विद्यार्थी मला येऊन भेटून म्हणतात, साहेब विषय सुटता सुटत नव्हता, तुमच्यामुळे पास झालो. एक विद्यार्थी दोन वर्ष LLB मध्ये अडकला होता आणि माझ्या निर्णयाने त्याला सनद मिळाली

येत्या काळात सोलापूर MIDC मध्ये मोठा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करेन. पेपरफुटी होता कामा नये, शिक्षण पारदर्शक असलं पाहिजे. महाराष्ट्राचा संस्कार अनेक राज्यांनी जतन केलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी संस्कारक्षम असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरुढ होऊन काही लोक फायदा घेतात, हे योग्य नाही.

विद्यानंद पाटलला मराठीचा ब्रँड ऍम्बासिडर केलं पाहिजे

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पुण्यात सुरू आहे. विद्यानंद या माणसाला मराठीचा ब्रँड ऍम्बासिडर केलं पाहिजे. मात्र, त्याचा फायदा किती राजकीय लोक घेतात, याचा विचार केला पाहिजे. मीही विद्यार्थी होतो, मीही आंदोलन केलेली आहेत. मात्र माझ्या बोलण्यामुळे कोणी दुखवणार नाही, याची काळजी मी घेतली आहे

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर ठोस पाऊले उचलली आहेत. आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना विनंती की, आपण सरकारबरोबर आणखी चर्चा करू शकता. विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, ही सरकार म्हणून आमची भूमिका आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

एखाद्या आंदोलनाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा, संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार तयार असेल, तर त्याला राजकीय वलंय देण्याला अर्थ नाही. देशात, राज्यात सध्या विद्यार्थ्यांच्या जीवावर राजकारण सुरु आहे. आपल्याला लोक जमत नाहीत, लोकांनी नाकारलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनालात घुसून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्योग दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहे.

मराठी माणसाला पहिलं मराठी बोलायला आलं पाहिजे. महाराष्ट्रातील पहिला शब्दकोश छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. मी उद्योगमंत्री म्हणून परदेशात जातो, तेव्हा जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT