सोलापूर : सोलापूर (Solapur) महापालिकेची हद्दवाढ 1992 मध्ये झाली. झेडपीचा भाग महापालिकेत आला, शाळा मात्र अद्यापही झेडपीकडेच राहिल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून या शाळा महापालिका हद्दीत द्याव्यात यासाठी प्रयत्न व पुढाकार सुरू आहे. झेडपीवर सदस्य असताना रखडेलेला विषय सोडविण्याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी झेडपी सीईओ तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्यावर सोपविली आहे. ज्या विषयातून सदस्य सुटले त्या विषयात आता सीईओ स्वामी अडकण्याची शक्यता आहे. (CEO Dilip Swami caught in ZP school transfer case)
तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या शाळांना डीपीसीमधून निधी देऊन हा विषय वेगळ्या मार्गाने सोडविण्याचा निर्णय घेतला होता. माजी मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारच्या (ता.4) जिल्हा नियोजन समिती बैठकीत हद्दवाढ भागातील शाळांचा विषय मांडला. आमदार देशमुख यांच्या या प्रश्नावर पालकमंत्री विखे-पाटील यांनी सीईओ स्वामी यांना सूचना करत शाळा हस्तांतरणाबाबत परिपूर्ण ठराव करून देण्याची सूचना केली.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या प्रश्नावर आपले मत नोंदविताना फक्त जागा आणि इमारती न घेता शिक्षकही हस्तांतरित करण्याची सूचना केली. त्यामुळे या विषयातील तांत्रिक बाजू अद्यापही शिल्लक आहेत. 15 वर्षात जिल्हा परिषदेच्या अनेक सर्वसाधारण सभांपुढे आलेला हा विषय कधीही मंजूर होऊ शकला नाही. शिक्षण विभागाने या संदर्भातील मार्गदर्शन ग्रामविकासचे तत्कालिन प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याकडे मागितले होते. अद्यापही त्यांना मार्गदर्शन मिळालेले नाही. या शाळांचे मुल्यांकन वाढवून मिळवावे अशी मागणी सदस्यांनी केली आहे या मुद्यांवर हा विषय प्रलंबित राहिला आहे. या विषयात सीईओ स्वामी कसा मार्ग काढतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आहेत ३७ शाळा
पाटील वस्ती, सोरेगाव, एसआरपी कॅम्प, सुशीलनगर वस्ती, टिकेकरवाडी, शिवाजीनगर, कुमठे, बागवानगर, दहिटणे, संगमेश्वरनगर, शेळगी, शेटेवस्ती कसबा, श्रमजीवीनगर, बाळे, केगाव, वारदफार्म, अंबिकानगर, आनंदनगर, बसवनगर, देगाव, देशमुखवस्ती, कोयनानगर, लोकुतांडा, प्रतापनगर, सलगरवाडी, कल्याणनगर, लोकमान्यनगर, मजरेवाडी, मार्कंडेयनगर, नेहरूनगर. (यातील काही ठिकाणी असलेल्या मुले/मुली/उर्दु शाळांची संख्या धरून एकूण 37)
आकडे बोलतात...
* हद्दवाढ भागातील शाळांची संख्या : 37
* हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांची संख्या : 2696
* हद्दवाढ भागातील शिक्षकांची संख्या : 153
* हद्दवाढ भागातील शाळांच्या वर्ग खोल्या : 183
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.