chandrakant Patil -  Chandrkant Jadhav -
chandrakant Patil - Chandrkant Jadhav -  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चंद्रकांतदादांच्या खेळीला दिवंगत आमदाराच्या पत्नीचे प्रत्युत्तर; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात खेळलेल्या खेळीला काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जाधव यांनी भाजपकडून आगामी पोटनिवडणूक लढण्यास चंद्रकांत पाटील यांना स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात भाजप काय भूमिका घेणार? निवडणूक बिनविरोध करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोल्हापुरमध्ये आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. पण त्याचवेळी भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्याची ऑफर देत एक प्रकारची खेळी खेळली होती.

'कोल्हापूर उत्तर'चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मागील महिन्यात १ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्यानंतर ५ राज्यांच्या निवडणुकीसोबत इथेही पोटनिवडणूक पार पडणार आहे. पण आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि परंपरेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसचे (Congress) आवाहन आहे. जिल्ह्याच्या भाजपमध्ये देखील निवडणूक लढवायची नाही असा मतप्रवाह आहे.

मात्र या निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले होते, पहिल्यापासून चंद्रकांत जाधव आणि त्यांचे कुटुंबिय भाजप व आरएसएसशी निगडित होते. त्यांचे बंधू भाजपचे नगरसेवक होते. तसेच चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीही भाजपच्याच नगरसेविका होत्या. मात्र युतीमध्ये कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. एकाच घरात भाजपचे दोन नगरसेवक आणि भाजपला जागा न मिळाल्याने चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढविली.

त्यामुळे आता आगामी पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र जर त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारून "काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार," असे सांगितले तर पोटनिवडणूक लढविण्याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल, असा इशाराही पाटील यांनी दिला होता.

त्यानुसार काल चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी जावून या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी जयश्री जाधव यांना आग्रह केला. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप कोअर कमिटीचाही यासाठी आग्रह असल्याचे सांगितले.

मात्र जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास स्पष्ट नकार दिला. पंढरपूर, देगलूरप्रमाणे येथेही भाजपला विरोधात निवडणूक लढवावी लागेल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी दबाव देखील आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर सुद्धा भाजपच्या चिन्हावर न लढण्यावर जयश्री जाधव ठाम राहिल्या. अखेर ‘कुटुंबीयांशी चर्चा करून निर्णय कळविते,’ असे सांगितल्यावर चंद्रकांत पाटील बाहेर पडल्याचे सरकारनामाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT