Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP NEWS : सोलापूर राष्ट्रवादीची भाकरी हेव्यादाव्यात अडकली अन्‌ करपली...!

जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्ष पदावर वर्षानुवर्षे तेच ते चेहरे....

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : प्रदेश व राष्ठ्रीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाकरी फिरविण्याचा शब्द कमालीचा लोकप्रिय झाला आहे. पण, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीत जुनी भाकरी अक्षरश: करपून गेली आहे. नव्या भाकरीसाठी आज पिठं मळले जाईल, उद्या मळले जाईलं याचीच वाट पाहण्यात नव्या पिढीतील कार्यकर्ते हताश दिसत आहेत. वर्षानुवर्षे तेच पदाधिकारी पदाला चिटकून बसल्याने सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीत सध्या कमालीचा निरुत्साह दिसत आहे. (Change of office bearers in Solapur NCP Congress was stopped)

तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर (Solapur) जिल्हा राष्ट्रवादीची (NCP)बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झाली होती. या बैठकीत शहर व जिल्हा राष्ट्रवादीतील पदाधिकारी बदलाची चर्चा झाली होती. बैठक होऊन कित्येक महिने उलटले तरीही अंतिम निर्णय काही झालाच नाही. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या बदलाच्या अधून-मधून चर्चा होतात. जिल्हाध्यक्ष साठे आयत्या वेळी काही तरी खेळी करतात आणि हा विषय पुन्हा चर्चेपुरताच मर्यादित राहतो.

तशीच स्थिती शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे व युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या बाबतीत आहे. वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला त्या पदावर राहण्याची संधी मिळाल्यास अन्य इच्छुकांना कधी संधी मिळणार? राष्ट्रवादी सत्तेत असताना त्याच व्यक्तींना संधी देतो आणि सत्ता गेल्यानंतरही पक्षाचे पद त्याच व्यक्तीकडे ठेवतो यामुळे राष्ट्रवादीत शिथिलता दिसत आहे.

जिल्हा राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माळशिरसचे नेते उत्तम जानकर या नावांची अधून-मधून चर्चा होते. शहराध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, शहर महिलाध्यक्ष बदलाच्या बाबतीतही तशीच स्थिती आहे. प्रत्यक्षात निर्णय मात्र काहीच होत नाही.

शहर राष्ट्रवादीत माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर तौफिक शेख व प्रमोद गायकवाड यांनी प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश होऊन अनेक महिने लोटले तरीही त्यांना राष्ट्रवादीत मनासारखे काम करण्यास संधी मिळते का? याचा कानोसा घेण्याची नितांत आवश्‍यकता आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकांच्या निवडणुकांना आणखी अवधी आहे. आता नवीन पदाधिकारी निवडल्यास त्यांना या निवडणुकांपूर्वी अपडेट होण्याची संधी मिळेल.

प्रश्‍न अनेक पण राष्ट्रवादी सुस्त

सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्‍न आहे. सोलापू्रची विमानसेवा, सोलापुरातील बेरोजगारी, प्रशासक असलेल्या महापालिकेत सर्वसामान्यांची होणारी हेळसांड, जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भाजप आमदारांची चाललेली मनमानी यासह अनेक प्रश्‍न सोलापूर शहर व जिल्ह्यात आहेत. या प्रश्‍नांवर आंदोलनाच्या माध्यामातून आवाज उठविण्याची कामगिरी पक्षातील जुनी भाकर करत नसल्याने जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर राष्ट्रवादी सुस्त दिसत आहे.

राष्ट्र्वादीच्या प्रभारींचेही दुर्लक्ष

सोलापूरचे तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर सोलापूर राष्ट्रवादीच्या प्रभारीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रभारी झाल्यानंतर आमदार भरणे फक्त एकच सोलापूरचा दौरा केला आहे. शहर राष्ट्रवादीचे निरिक्षक शेखर माने अधून-मधून सोलापूरला येतात, ठराविक नेत्यांसोबत चर्चा करतात आणि निघून जातात अशीच स्थिती आहे. आगामी निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला नवीन चेहऱ्यांवर चांगले यश मिळण्याचे वातावरण आहे. त्यासाठी वेळीच जबाबदारी निश्‍चित करून देण्याची आवश्‍यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT