Governer Bhagat singh Koshyari
Governer Bhagat singh Koshyari sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजभवनात रमली माणदेशी मुलं; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप...

रूपेश कदम

दहिवडी : तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभिनव प्रयोग करुन नावलौकिक मिळवलेल्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजयनगर मधील मुलांच्या पाठीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुकाची थाप दिली. भव्य राजभवन पाहून माणदेशी मुलं हरखून गेली.

विजयनगर शाळा सध्या माण तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर राज्य व राज्याबाहेर चर्चेत आहे. ग्रामीण भागातील या शाळेत प्रयोगशिल शिक्षक बालाजी जाधव यांच्या कल्पकतेने शिक्षणात नाविन्यपूर्ण बाबी व अनेक अभिनव प्रयोग घडत आहेत. तीन वर्षापूर्वी फक्त १० विद्यार्थी संख्या असणाऱ्या या शाळेची आज ३५ पटसंख्या आहे. पहिली ते चौथी या चार वर्गांना बालाजी जाधव हे एकमेव शिक्षक अध्यापन करतात.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून अध्यापनाचे अभिनव उपक्रम राबवत असल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथे या शाळेतील दहा विद्यार्थ्यांना भेटीचे निमंत्रण दिले. बालाजी जाधव यांनी शिक्षण विभागाच्या परवानगीने गोरगरीब मजूर पालकांच्या मुलांना राजभवनात नेऊन राज्यपालांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

राज्यपालांनी मुलांशी अतिशय मनमोकळा संवाद साधून मुलांना भेटवस्तू दिल्या. या भेटीत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत त्यांना येणाऱ्या अनेकविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. टॅबच्या सहाय्याने गणित, इंग्रजी, भाषा आदींच्या अध्ययनाचा सराव तसेच टॅबवर पियानो वंदन करुन दाखवले. वारली चित्रकला रेखाटन, घड्याळ निर्मिती, धनुर्विद्या या सर्व बाबी या ग्रामीण मुलांनी करुन दाखवल्या.

ग्रामीण भागातील या मुलांनी या गोष्टी का व कशा शिकल्या याचे राज्यपालांना आश्चर्य वाटले. राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन प्रत्येक विद्यार्थ्यासोबत फोटो काढून विद्यार्थ्यांना आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही यशस्वी होण्यासाठी ही लेखणी मी तुम्हाला देत आहे असे म्हणत प्रत्येकाला पेन भेट दिले. तर विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने शाळेत तयार केलेले साबण, वारली फ्रेम, स्टेथोस्कोप, घड्याळ आशा वस्तू राज्यपालांना भेट दिल्या. बालाजी जाधव यांनी शाळेतील सर्व उपक्रमांचे प्रोजेक्टरवर सादरीकरण केले. राजभवान परिसरातील सुदंर लॉन, समुद्र, मंदिर, बंकर, प्राणी पक्षी पाहून गावखेड्यातील विद्यार्थी भारावून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT