Shahu Maharaj Chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahu Maharaj Chhatrapati : काँग्रेसकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

Rahul Gadkar

Lok sabha Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा सोडल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी संघटित काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचारात आघाडी घेतली असून बुधवारी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचाराची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

सध्या महायुतीकडून उमेदवार कोण असणार याबाबत संभ्रम निर्माण असला, तरी प्रमुख दावेदार म्हणून संजय मंडलिक यांचे नाव समोर येत आहे. मात्र शाहू महाराज छत्रपती(Shahu Maharaj Chhatrapati) यांच्यासमोर संजय मंडलिक यांना फारसे यश मिळणार नाही असे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना अंदाज आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने महायुतीतील त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

शिवसेना ठाकरे गटानेही या मतदारसंघावर दावा केला असला तरी शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पाइक आहेत. दुसरीकडे, पुरोगामी अशी कोल्हापूरची प्रतिमा पुसून टाकण्याचा डाव काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी सुरू केला आहे, हे गेल्या तीन-चार वर्षांतील विविध घटनांवरून दिसू येते. त्याला छेद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूरची लढत ही व्यक्तिगत नसून ती वैचारिक आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी अशी ही लढत होणार असून त्याचा संदेश राज्यभर जाणार आहे. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर राज्यसह देशाचे लक्ष राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत आले.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण वर्गाचा हिंदुत्वाकडे ओढा वाढला आहे. अशातच पारंपारिक शाहू विचारांच्या मतदारांना एकत्र करण्याचे काम शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवरून होणार आहे. शिवाय शिंदे गट(Eknath Shinde), राष्ट्रवादीतील गटातील अनेक पारंपरिक कार्यकर्त्यांना शाहू महाराज यांच्या विषयी आदर आहे. ती मतं मिळवण्यासाठी शाहू महाराज यांच्या सक्षम उमेदवाराचा चेहरा काँग्रेसकडून पुढे करण्यात आला आहे.

शाहू महाराज छत्रपती कोणत्याही एका राजकीय व्यासपीठावर नसले तरी कोल्हापुरात सर्व राजकीय पक्ष, संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातो. अलीकडे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय कोल्हापुरातील सभेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ तास आंदोलनासंदर्भात महामार्गावर रस्ता रोको केले होते. त्यावेळी देखील शाहू महाराज यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याचा सल्ला राजू शेट्टी यांना दिला होता. अलीकडच्या दोन-तीन महिन्यांत त्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत.

राजर्षी शाहू, फुले, आंबेडकर यांचा समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा पुरस्कार करणे, त्यांचा प्रचार आणि प्रसार करणे. शाहू महाराज छत्रपती यांचे सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. संवेदनशील विषयावर तत्काळ भूमिका घेत मार्ग काढण्याची भूमिका ते स्वीकारतात. कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तत्परता त्यांनी दाखवण्याचे धाडस शाहू महाराज छत्रपती यांनी केले होते.

शिवाय माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचा जिल्हावर संपर्क आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावर त्यांनी गाव पातळीवर संपर्क ठेवून जनतेशी नाळ ठेवली आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी देखील शाहू विचारांचा वारसा जोपासत क्रीडा क्षेत्रात योगदान सुरू ठेवले आहे. महाविकास आघाडी कडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा आमदार आणि दोन विधान परिषद आमदारांचे बळ शाहू महाराज छत्रपती यांच्या मागे राहणार आहे.

कोण आहेत शाहू महाराज छत्रपती? -

शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी मुंबईत झाला. नागपूर आणि बंगळुरू येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सध्याच्या छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मीयतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत. शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यानंतर त्यांची कोल्हापुरात करवीर अधिपती अशी ओळख आहे.

यातील शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले यांच्याकडून दत्तक घेतले. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजले होते. शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध होता आणि त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाल्याचे सांगितले जाते. 1970 च्या दरम्यान महाराज दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984 ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर आले. दत्तक प्रकरणावरून झालेला वाद यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनात नव्हते. मात्र 1995ला युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेमध्ये गेली होती.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे. यातूनच 1999 ला राष्ट्रवादी मधून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस शाहू महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT