Kolhapur News : ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढल्यानंतर येत्या चार आठवड्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुढील चार महिन्यात ही प्रतिक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान या आदेशानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली चांगल्याच गतिमान झाल्या असतानाच काँग्रेसला कोल्हापुरमध्ये भगदाड पडणार आहे. येथे काँग्रेसचे दहा माजी नगरसेवक उपमहापौर, सभापती यांना सोबत घेऊन काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील राजकीय शह दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत. पण या निवडणुका स्वतंत्र लढाव्या की एकत्र लढाव्या याबाबतचा फॉर्म्युला महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा निश्चित झालेला नाही. तरी आतापासूनच इच्छुकांनी राजकीय सोय करण्याची भूमिका घेतली आहे.
लोकसभा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सध्या अनेक जण महायुतीतील तिन्ही पक्षाच्या वाटेवर आहेत. अशातच काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल दिल्यानंतर कोल्हापूर शहरातील काँग्रेसचे जवळपास दहा ते बारा नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत. यामध्ये काही उपमहापौर, सभापती यांचा देखील समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर अनेकांची नाराजी पाहायला मिळाली. या नाराजीतूनच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला. इतकेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने सरकार मधल्या पक्षातून निवडणूक लढवण्याची भूमिका अनेकांनी घेतली आहे. यातून काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेले काही नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत. त्याबाबतच्या बैठका देखील झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये काँग्रेसच्या एका माजी सभापतीने प्रमुख भूमिका घेतली आहे. तर दहा माजी नगरसेवक उपमहापौर, सभापती यांना सोबत घेऊन काँग्रेस सोडण्याचा विचार पक्का केला आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख शिलेदार, उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांचा देखील यामध्ये समावेश आहे. पुढील आठवड्यात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान एका प्रमुख पदाधिकाऱ्याने 10 नगरसेवक सोबत घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याचा शब्द शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठांना दिल्याचे समजते.
मात्र प्रत्यक्षात तीन नगरसेवकच सोबत असल्याचे सांगितले जाते. तर काही वेळासाठी हा पक्षप्रवेश थांबवल्याचे देखील माहिती मिळत आहे. पण पुढील आठवड्यात यातील काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यातील एका प्रमुख पदाधिकाऱ्याला काही आमदारांनी विरोध केल्याचे देखील समोर येत आहे.
दरम्यान काँग्रेसच्या या काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास हा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का समजला जाणार आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची प्रमुख भूमिका आमदार सतेज पाटील यांची असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.