vitthal sugar factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भगिरथ भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कारखान्यात १७ कोटींचा घोटाळा

सखोल चौकशी करुन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

भारत नागणे : सरकारनामा ब्युरो

पंढरपूर : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असतानाच आता कारखान्याच्या संचालक मंडळावर विविध आरोप होऊ लागले आहेत. डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळावर साखर उतारा चोरुन 17 कोटींचा साखर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पाटील यांनी पत्रकार परिषदेत रविवारी (ता. 26 सप्टेंबर) केली आहे. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत मोठी खळबळ उडाली आहे. (Corruption of Rs 17 crore in Vitthal Sugar Factory: Abhijit Patil)

विठ्ठल कारखान्याची 45 व 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद असलेल्या पाटील यांनी कारखान्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करुन त्या प्रश्नांची उत्तरे संचालक मंडाळांनी द्यावीत, अशी लेखी मागणी केली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की, गाळप हंगाम 2020-21 मध्ये संचालक मंडळाने साखर उतारा कमी दाखवून त्याची चोरी केली आहे. या हंगामाध्ये 3 लाख 3 हजार 547 टन उसाचे गाळप झाल होते. त्यामधून 2 लाख 67 हजार 255 साखर पोत्याचे उत्पादन झाले होते. एमएसपी नुसार 82 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये साखरेची किंमत होते. एफआरपी नुसार शेतकर्यांना 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपयांचे देणे लागते. मात्र यातील सुमारे 35 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम अजूनही थकीत आहे. एफआरपी थकल्यामुळे आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे

याच गाळप हंगामामध्ये मॅालेसे विक्रीतून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर कारखान्याने वीज वितरण कंपनीला 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपयांची वीज विकली आहे. कारखान्याला मागील गाळप हंगामात एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातून ऊस बिल, ऊस वाहतूक, तोडणी आणि कामगारांचा पगार यासाठी 93 कोटी 95 लाख 76 हजार 900 रुपये देणे लागते. आलेल्या उत्पन्नातून शेतकरी ऊसबिल, वाहूतक आणि कामगारांची देणी देवून कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहणे अपेक्षिक आहे, मात्र तरीही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम आणि कामगारांचे पगार थकीत का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिल्लक 17 कोटी 13 लाख रुपयांची रक्कम गेली कुठे याचा हिशेब संचालक मंडळाने द्यावा, कारखान्याच्या दुरावस्थेला आणि आर्थिक परिस्थितीला विद्यमान संचालक मंडळच जबाबदार आहे. सर्व संचालकांची चौकशी करुन त्यांच्यावर साखर आयुक्तांनी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी केलेल्या आरोप संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT