Ahmednagar News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : नगरमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले; सक्षम पोलीस अधीक्षक द्या; राष्ट्रवादीची अजित पवारांकडे मागणी!

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये मागील १० महिन्यापासून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीय दंगली, टोळी युध्द जास्त प्रमाणात वाढले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यातून मिळणा-या भरमसाठ पैश्यातून जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. (Latest Marathi News)

भररस्त्यावर टोळीयुद्ध आणि हत्यांसारख्या घटना घडत आहेत. पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरुन खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. अन्यथा सक्षम पोलीस अधीक्षक अहमदनगर जिल्ह्यासाठी तातडीने नेमणे गरजेचे आहे, असे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले आहे.

शहरात महिनाभरात तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यावर वर्दळीच्यावेळी दोन युवकांच्या हत्या झाल्याने नगर शहर पुरते हादरले आहे. या हत्या संघटीत टोळ्यांकडून झालेल्या असून, यामागचे मूळ कारण शहरात प्रचंड फोफावलेले अनेक अवैध व्यवसाय आहेत. मात्र या अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यात आणि बेबंद झालेल्या गुंडांच्या टोळ्यांना आवर घालण्यात पोलिसांना अपयश आल्याचे घडलेल्या घटनांवरून दिसून येते आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, अमित खामकर आदींनी निवेदन दिले आहे. निवेदनात, शहरातील मुकुंदनगर भागामधील एका मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. त्यामुळे महाराष्ट्राभरात त्याचे पडसाद उमटले. शेवगाव तालुक्यामध्ये हिंदु मुस्लिम मध्ये जातीय दंगल झाली. संगमनेर तालुक्यात सुध्दा याचे पडसाद उमटून मोठ्या प्रमाणावर जातीय दंगल उसळली. तसेच अहमदनगर शहरामध्ये रामवाडी, कोठला भागात तसेच माळीवाडा, सूर्यनगर, एम.जी.रोड, कापड बाजार या भागांमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्यामुळे कित्येक व्यापारी व गोरगरीब नागरिकांचे त्यामध्ये नुकसान झाले.

तसेच लव्ह-जिहादचे प्रकार आणि जातीय धर्मांतराचे प्रकरणात वाढ झालेली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित नसून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई, तडीपारीची कारवाई ही थंड झालेली आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी अहमदनगर जिल्ह्यात डोके वरती काढलेले आहे.

अहमदनगर शहरामध्ये झालेले टोळी युध्दामुळे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन युवकांची हत्या झाली आहे. त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनहद्दीत दोन हत्या झालेल्या आहेत. तरी त्याची अजून उकल झालेली नसल्याने त्यामुळे पोलीस प्रशासनाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे. या घटना दोन महिन्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये घडल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाचा अजूनही गुन्हेगारांवर वचक बसलेला नाही.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी रस्त्यावर उतरुन खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. अन्यथा सक्षम पोलीस अधीक्षक अहमदनगर जिल्ह्यासाठी तातडीने नेमणे गरजेचे आहे, अशी निवेदनात मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT