BJP MLA Samadhan Autade Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केला आमदार समाधान आवताडेंचा करेक्ट कार्यक्रम

Samadhan Autade | BJP | : शिवसेनेतील बंडाप्रमाणेच भाजपमधील बंड भाजपचे आमदार समाधान यांना भोवले...

हुकुम मुलाणी

मंगळवेढा : राज्यातील सत्ता स्थापनेदरम्यान ज्याप्रमाणे शिवसेनेत (Shivsena) बंड झाले, त्याप्रमाणेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्येही भाजपामध्ये (BJP) बंड होऊन भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी आमदार समाधान आवताडेंचा (Samadhan Autade) करेक्ट कार्यक्रम केला आहे. समविचारी आघाडीच्या रूपाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार आवताडे यांना आव्हान देत राष्ट्रवादीच्या मदतीने श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवली आहे. समविचारी गटामध्ये भगीरथ भालके व प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी पहिल्या व दुसऱ्या फेरीचा निकालानंतर विजय जल्लोष सुरू केला अनेक आणि सोशल मीडियातून या विजयाचा आनंद साजरा केला. आजच्या निकालामध्ये धनगर समाजाचे नेते तानाजी खरात यांचे मताधिक्य सर्वात जास्त होते. तर त्यापाठोपाठ समविचारी आघाडीचे शिवानंद पाटील यांचा नंबर लागतो.

समविचारी गटातून तानाजी खरात, शिवानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार, तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे, मागासवर्गीय आघाडीचे तानाजी कांबळे हे विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी.पाटील, भारत बेदरे, माजी सभापती निर्मला काकडे, लता कोळेकर विजयी झाले. या सोबतच चरणुकाकाचे वारसदार राजेंद्र पाटील, महादेव लुगडे, माजी संचालक बसवराज पाटील, भिवा दौलतडे, मुरलीधर दत्तू, दयानंद सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे हे विजयी झाले. त्यामुळे साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला असून त्यामध्ये भाजप आमदार समाधान आवताडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर त्यांच्याच विरोधी गटातून भाजपचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष विजयी झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले.

कारखान्याची यंदाची निवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार ठरत गेली. सलग तीन वर्ष ऊसपुरवठा केला नसल्याच्या कारणावरून घेतलेल्या हरकतीत समविचारी गटाचे जवळपास ३६ मातब्बर उमेदवार बाद ठरले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सत्ताधारी गटाचे अशोक केदार हे सत्ताधारी गटातून बिनविरोध निवडले गेले. निवडणूक एकतर्फी झाली होती. अशा परिस्थितीत समविचारी गटाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान देत प्रचारादरम्यान सुमारे १९ हजार ५०० सभासद अक्रियाशील करणे, कामगारांचा पगार न देणे, असे अनेक आरोप सत्ताधाऱ्यांवर करण्यात आले. तर सत्ताधारी गटांनी सहा वर्षात केलेला कारभार, दिलेली एफआरपी आधी मुद्दे सभासदासमोर मांडले. ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी देखील अंतिम टप्प्यात सत्ताधारी गटाला कौल दिला. मात्र सभासदांनी त्यांचा कौल समविचारी गटाला दिला.

संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर आवताडे १४५ मतांनी विजयी झाले. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाचा बालेकिल्ला असलेल्या मंगळवेढा ऊस उत्पादक गटात त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. दरम्यान सभासदांनी दिलेला कौल मान्य करत आमदार समाधान आवताडे यांनी नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. तर संस्था वाचवण्याच्या दृष्टीने दामाजीची निवडणूक सभासदांनी हातात घेतली, ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे, कामगारांच्या पगारी न देणे या सर्वच बाजूनी सत्ताधाऱ्यावर रोष होता, तो रोष त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला अशी प्रतिक्रिया समविचारी आघाडीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT