DCC Bank Solapur
DCC Bank Solapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

DCC Bank : कारवाईपूर्वीच सरव्यवस्थापक मोटेंनी दिला राजीनामा

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (DCC Bank) सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे (K.V. Mote) हे विभागीय चौकशीत दोषी आढळले आहेत. कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवार (ता. 28 फेब्रुवारी) हा मोटे यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या कारकीर्दीतील शेवटचा दिवस ठरला आहे.

डीसीसी बॅंकेला नवीन सरव्यवस्थापक मिळणार असून गुरुवारी (ता. 3 मार्च) किंवा शुक्रवारी (ता.4 मार्च) नवीन सरव्यवस्थापक रुजू होण्याची शक्यता आहे. नवीन सरव्यवस्थापक बाहेरून येणार की डीसीसीमधील अधिकाऱ्याला पदोन्नती मिळणार या बद्दल डीसीसीच्या वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मोटे यांच्या संदर्भात सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक कर्मचारी संघटनेने तक्रार केली होती. संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष शशिभाऊ शिंदे सचिव राजेश गवळी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. या तक्रारीवर चौकशी अधिकारी तथा वर्ग दोनचे अपर विशेष लेखा परीक्षक जे. के. तांबोळी यांनी स्वयंस्पष्ट अभिप्राय व चौकशी अहवाल सादर केला होता. या अहवालानंतर बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी सरव्यवस्थापक मोटे यांची विभागीय चौकशी (डी. ई.) लावली होती. ही चौकशी करण्यासाठी सहकार विभागातील वर्ग दोनचे निवृत्त अधिकारी एस. आर. कदम यांची नियुक्ती केली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मोटे यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

मोटेंवर ठेवण्यात आलेला ठपका

सरव्यवस्थापक मोटे यांची शैक्षणिक पात्रता कोणतीही मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून पूर्ण झाली आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीमुळे वादग्रस्त ठरलेल्या या विद्यापीठातून मोटे यांनी टेकक्विक हा स्थापत्य अभियांत्रिकीचा कोर्स पूर्ण केला आहे. बॅंकेत सुरवातीला अभियंता म्हणून व नंतर बॅंकेचे सरव्यवस्थापक म्हणून मिळवलेली नोकरी, बार्शी तालुक्‍यातील आर्यन शुगरमध्ये बॅंकेच्या कर्जदार व थकबाकीदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत होईल या पद्धतीने केलेले कामकाज, जिल्हा बॅंकेतील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याने ही चौकशी करण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रशासक शैलेश कोथमिरे म्हणाले, मोटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल आल्यावर कारवाई पूर्वीच त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली. नवीन सरव्यवस्थापक लवकरच रुजू होतील. डीसीसीमध्ये सरव्यवस्थापक मोटे यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे, अशी प्रतिक्रिया कोथमिरे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT