Atpadi tahashildar Jeep
Atpadi tahashildar Jeep sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वाळू तस्करांची मुजोरी; आटपाडीच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर आटपाडी-मुढेवाडी रोडवर रात्री वाळू तस्कराकडून हल्ला करण्यात आला आहे. तहसीलदार माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसीलदाराना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे.

सांगली जिल्ह्यात वाळू तस्करी फोफावली आहे. नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. यासाठी आटपाडीच्या तहसीलदार धाडसी लेडी सिंघम बी. एस. माने यांनी कारवाई सुरू केली आहे. अनेक कारवाया त्यांनी केल्या आहेत. तहसीलदार कार्यालयासमोर जप्त केलेल्या अनेक वाळूच्या गाड्या पडून आहेत.

रात्री तहसीलदार बी. एस. माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या होत्या. त्यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने जात असल्याचे समजले. पथकाने त्याचा पाठलाग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला. त्याच ठिकाणी थोड्यावेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला. या डंपरने तहसीलदार यांच्या गाडीवर गाडी घातली. 

चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप वाचले आहेत. मात्र, डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार मॅडम काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. संबंधित डंपर चालकांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT