पश्चिम महाराष्ट्र

Congress : काँग्रेसमध्ये नाराज आहात का? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

Umesh Bambare-Patil

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांही काबीज केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत आहेत,’ असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दरम्यान, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी झाली. ही निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार झाली. आता मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ही यात्रा येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल, हेही पाहिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना श्री. चव्हाण म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न आहे. कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहेत. राज्यातील सरकार तर तात्पुरती व्यवस्था आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल.’

काँग्रेसवर आपण नाराज होता, त्याचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, त्यावेळी आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र दिले होते. हे पत्र गोपनीय होते. तरीही त्याची माहिती बाहेर गेली. त्यावेळी सोनिया गांधींनी सर्व बाबी मान्य केल्या. आता नाराज असण्याचे कारणच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT