Sangola, 15 October : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच अजितदादांना सोलापूरमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. साळुंखे यांच्या राजीनामामुळे ते अपक्ष लढणार की 'मशाल' हाती घेणार? याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगोल्यात मी शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार शहाजी पाटील यांना मदत केली आहे, त्यामुळे त्यांनी आता आपल्याला संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगोल्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जनता हाच माझा पक्ष आहे. तालुक्यातील जनतेने मला तुम्ही निवडणुकीत उभे राहण्यास सांगितले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार असणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा देत असल्याचे दीपक साळुंखे यांनी सांगितले.
साळुंखे म्हणाले की, गेली 30-35 वर्षे राजकीय जीवनामध्ये प्रथमतः शेतकरी कामगार पक्षाचे ऋषितुल्य नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांना आमदार करण्यात माझी महत्वाची भूमिका राहिली आहे. मी व माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यावेळी गणपतराव देशमुख यांचा प्रचार केला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीमध्ये मी पक्षभेद विसरून आमदार शहाजी पाटील यांनाही मदत केली होती.
सांगोला तालुक्यातील या दोन्हीही पक्षातील नेतेमंडळींना माझे आवाहन आहे की यावेळी आमदार शहाजी पाटील व डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला मदत करावी. मी कोणत्याही परिस्थितीत यावेळी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे. या पुढील काळात राजकीय पक्षातील कोणी मदत करण्यात तयार असल्यास मी त्याचाही निश्चितपणे विचार करेल, असेही साळुंखे यांनी नमूद केले.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांची साथ सोडली आहे. बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार असून तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर तुतारीवर नाही तर अपक्ष निवडणूक लढवेल, अशी घोषणा खुद्द बबनराव शिंदे यांनी केली आहे.
याशिवाय करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनीही विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांची जागा वाटपावेळी कसोटी लागणार हे निश्चित आहे, त्यामुळे अजितदादा आपल्या सहकाऱ्यांसाठी कशी जागा सोडवतात, हे पाहावे लागणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.