Dharmanna Sadul Passed Away Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : विणकरांचा बुलंद आवाज हरपला; माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन

Solapur Lok Sabha Constituency Former MP Dharmanna Sadul Passed Away : सोलापूरचे खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन...

Anand Surwase

Solapur Latest News : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते धर्मण्णा सादूल (वय-80) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. सादूल यांनी 1989 आणि 1991 असे दोनवेळा लोकसभेत सोलापूरचे प्रतिनिधित्व केले होते. नगरसेवक ते खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करत असताना सादूल यांनी सोलापूरचे विणकर, यंत्रमाग कामगार यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते विणकरांच्या हितासाठी लढा देत राहिले. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

19 जानेवारी 1943 रोजी सादूल यांचा जन्म झाला होता. वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सादूल यांनी राजकारणात प्रवेश केला. पद्मशाली समाजाचे नेतृत्व करणारे धर्मण्णा सादूल हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. ते 50 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत होते. 1974 मध्ये प्रथम ते नगरसेवक झाले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना सोलापूर महापालिकेचे महापौर केले. दरम्यान, 1989 मध्ये काँग्रेसने त्यांना सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. या निवडणुकीत विजयी होत पहिल्यांदा ते खासदार झाले. त्यानंतर 1991 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीतही त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती. त्यानंतर पुढे त्यांनी 1999 ला राष्ट्रवादीत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. पण तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मूळचे काँग्रेसची विचारसरणी असलेल्या सादूल यांनी पुन्हा स्वगृही काँग्रेस पक्षात परतणे योग्य समजले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुशीलकुमार शिंदेंकडून श्रद्धांजली

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शोक व्यक्त करत सादूल यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिंदे यांनी सादूल यांच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते धर्मण्णा सादूल यांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय वाईट वाटले. एक चांगला सहकारी आणि चांगला नेता आज आपल्यात नाही. सादूल महापौर असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी सोलापूरचा काँग्रेसचा उमेदवार बदलायचा असल्याचे सांगितले होते. त्यावेळी आम्ही सगळा विचार करून आणि अनेकांशी चर्चा करून पूर्व विभागातील धर्मण्णा सादूल यांचे नाव पुढे केले. त्यावेळी ते सोलापूरचे महापौर होते. त्यानंतर पक्षाने त्यांना तिकीटही दिले आणि सादूल काँग्रेसकडून खासदार झाले. खासदार म्हणून सादूल यांनी सोलापूरचे अनेक प्रश्न, विशेषता विणकर समाज आणि कामगारांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणारा एक प्रामाणिक नेता आज आपल्यातून हरपला असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

राजकारणात नगरसेवक, महापौर, खासदार, संसदीय समितीचे सदस्य, तसेच काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशी अनेक पदांवर सादूल यांनी काम केले होते. दरम्यान, या वर्षीच त्यांनी तेलंगणातील केसीआर यांच्या बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. अखेर आज उपचारादरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

(Edited by Sachin Fulpagare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT