करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घोषित आरक्षणामुळे तरुण नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मोठी निराशा व्यक्त झाली आहे.
पाचपैकी चार जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप, पृथ्वीराज पाटील यांसारख्या इच्छुकांना थेट संधी मिळणे कठीण झाले आहे.
काही नेत्यांनी आता आपल्या पत्नींना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला असून काहींना पंचायत समिती निवडणुकीकडे वळावे लागणार आहे.
Solapur, 14 October : करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर, या निवडणुकीत उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण नेतृत्वाची व त्यासाठी तयारीला लागलेल्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, माजी आमदार जयंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप, आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील या प्रमुख युवा नेतृत्वाला आरक्षणामुळे संधी मिळणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रमुख गटांच्या घरातील नेतृत्वाला या वेळी थेट संधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या करमाळा (Karmala) तालुक्यातील सहापैकी पाच जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. चिखलठाण गट एकच सर्वसाधारण आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे भोसले यांच्यासाठी, तर चिखलठाण जिल्हा परिषद गटात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत सरडे, सरपंच तानाजी झोळ, प्रमोद बदे, प्रशांत पाटील यांच्यासाठी सोयीचे आरक्षण पडले आहे.
कोर्टी जिल्हा परिषद (ZP) गटातून माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गुळवे निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्याने ते आपल्या घरातील कोणाला उभे करतात का? ते पंचायत समिती निवडणूक लढवणार का? हे पाहावे लागणार आहे.
दिग्विजय बागल हे पांडे जिल्हा परिषद गटातून किंवा पांडे व रायगाव पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पांडे जिल्हा गट हा सर्वसाधारण महिलेसाठी तर पांडे पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला आणि रायगाव अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. याच मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले जगताप गटाचे शंभूराजे जगताप, माजी पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांची निराशा झाली आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई वारे या पुन्हा निवडणूक लढवू शकतात. हिसरे पंचायत समिती गणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे निवडणूक लढवू शकतात.
आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे वांगी जिल्हा परिषद गट किंवा जेऊर पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्याने पृथ्वीराज पाटील यांची स्थानिक स्वराज्य संस्थेतील एन्ट्रीला खो बसला आहे.
वीट जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे गणेश चिवटे यांची मात्र गैरसोय झाली असून, ते त्यांची पत्नी अश्विनी चिवटे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती अतुल पाटील या इच्छुकांची आरक्षणामुळे अडचण झाली आहे.
प्रश्न 1 : करमाळा तालुक्यातील किती जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाले आहेत?
सहापैकी पाच गट महिलांसाठी राखीव झाले आहेत.
प्रश्न 2 : कोणत्या युवा नेत्यांची निराशा झाली आहे?
दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप आणि पृथ्वीराज पाटील यांची.
प्रश्न 3 : गणेश चिवटे यांनी कोणता निर्णय घेतला आहे?
त्यांनी आपल्या पत्नी अश्विनी चिवटे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.
प्रश्न 4 : कोणत्या नेत्याला पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत अवताडे हिसरे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.