prashant paricharak-Dilip Dhotre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांचा राजकीय बॉम्ब : दिलीप धोत्रे अन॒ आमची अलिखित युती ; मला करता येत नाही, ते काम दिलीपबापू करतो अन्‌...

Pandharpur Political News : पंढरपूरच्या राजकारणात वेगवान घडामोडींमध्ये प्रशांत परिचारक यांनी मनसेसोबत अलिखित युती असल्याचा दावा करत स्वतःचे महत्त्व अधोरेखित केले, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 April : पंढरपूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंढरपुरात सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. त्यावेळी रंगलेल्या टोलेबाजीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मनसेचे उपनेते दिलीप धोत्रे आणि आमची अलिखित युती आहे, असे ठणकावून सांगितले. तसेच, ‘माझ्या मदतीशिवाय तुम्ही...’असे अर्धवट सांगत पंढरपूरच्या राजकारणातील आपले महत्वही अधोरेखित केले.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यात आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्ष प्रणिता भालके, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत दिलीप धोत्रे आदींनी उपस्थिती लावली. या वेळी राजकीय नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या.

दिलीप धोत्रे आणि आमची अलिखित युती आहे. मला जे करता येत नाही, ते दिलीपबापू करतो आणि दिलीपबापूला जे करता येत नाही, ते आम्ही करतो. बरोबर का नाही बापू?, असा सवाल करत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी धोत्रे यांच्या खांद्यावर थाप टाकली.

नगरपालिका निवडणुकीत दिलीप धोत्रे आणि प्रशांत परिचारक यांच्यातील अलिखित युती कळली होती, असे विधान एकाने करताच प्रशांत परिचारकांनी ‘अरं हाईच... नगरपालिका असो नसो..युती हाईच’ असे ठणकावले. तसेच, दिलीपबापू पहिला माझा उमेदवार आहे. आमची अदृश्य युती नाहीच, दृश्य आहे. झाकून काय...?असेही परिचारक यांनी स्पष्ट केले.

आता अनिलदादाही सोबत आहेत, असा उल्लेख एकाने करताच प्रशांत परिचारक यांनी ‘ते आता युतीत असल्यामुळे आमच्यात विषयच नाही. संतोष सुळे अजून कुठायं हेच कळत नाही. त्याचे दाखवायचे सुळे वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.

सुळे इकडं आला की वेगळा, नदीच्या पलीकडे माढ्यात गेला की वेगळा, करमाळ्यात वेगळा, सांगोल्यात वेगळा, मोहोळमध्ये वेगळा आणि पंढरपुरात वेगळा आहे. इस्लामपूरला गेला की आणखी वेगळा आहे, जामखेडमध्येही वेगळा आहे,’ असा टोला संतोष सुळे यांना लगावला.

तुमच्या ह्याला माझीच मदत आहे. माझ्या मदतीशिवाय तुम्ही... असे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरच्या राजकारणातील आपले महत्व अधोरेखित केले. त्यामुळे आंबेडकर जयंतनिमित्त पंढरपुरात रंगलेल्या राजकीय टोलेबाजीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT