Crime news
Crime news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा मानवतेला काळिमा : पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी, लोणीमावळा येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार व खुनाच्या घटना घडल्या तसाच काहीसा प्रकार आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडला आहे. पाच वर्षांच्या बालिकेवर अमानवीय अत्याचार एका नराधमाने केला. या प्रकारानंतर त्या नराधमाने बालिकेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र बालिकेची आई घटनास्थळी आल्याने तिचा जीव वाचला. ( Disgrace to humanity again in Ahmednagar district: Atrocities on five year old girl )

आरडगाव येथे अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा अमानवीय घटना घडली. नराधमाने अत्याचार केल्यावर बालिकेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राहुरी पोलीस ठाण्यात आज (रविवारी) अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे.

किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, (रा. आरडगाव, ता. राहुरी) असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. काल (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता नराधम आरोपीने पीडित बालिकेच्या घरात आई-वडील नसल्याचा गैरफायदा घेतला. बालिकेला उचलून नारळाच्या झाडा जवळ खुरुद यांच्या शेताच्या बांधावर नेले. तेथे बालिकेवर अमानवीय अत्याचार केला. नंतर बालिकेच्या कपड्याने, तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न नराधम आरोपीने केला. एवढ्यात, बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेणारी तिची आई घटनास्थळी पोचली.

आईने नराधम आरोपीला जागेवर पकडून आरडाओरडा केला. बालिकेच्या वडिलांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहताच नराधम आरोपीने पीडितेच्या आईला धक्का मारुन, पलायन केले. नशीब बलवत्तर म्हणून बालिकेचे प्राण वाचले. तिला उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नाऱ्हेडा यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस पथकाने काल (शनिवारी) शोध घेऊन, नराधम आरोपीला ताब्यात घेतले. आज (रविवारी) पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT