Mahadev Jankar Latest News
Mahadev Jankar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पक्षावर दावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्षभरापूर्वीच हकालपट्टी : रासपचं स्पष्टीकरण

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पक्ष फुटीचे सत्र सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने (ShivSena) पाठोपाठ माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात (Rashtriya Samaj Party) देखील उभी फूट पडली असल्याचा दावा रासपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे केला होता. यामुळे रासपमध्ये मध्ये मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, यावर रासपकडून अधिकृत स्पष्टीकरणं आले असून रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी असा दावा केला आहे त्यांची पक्षाने 2021 लाच हकालपट्टी केली असून ते पक्षाचे पदाधिकारीच नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. (Mahadev Jankar Latest News)

रुपनवर म्हणाले की, ज्यांनी बारामती येथे मेळाव्याचे आयोजन केले ते बाळासाहेब दलतोडे यांची डिसेंबर 2021 मध्येच पक्षाच्या महासचिव या पदावरून निष्क्रिय कामकाजामुळे पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या आदेशावरून आणि सर्व जिल्हाध्यक्षांच्या आग्रहामुळे हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनतर ते गेले 8 महिने पक्षाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी बारामतीतील उंडवडी येथे यशवंत सेनेमार्फत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा कुठलाही सक्रिय कार्यकर्ता उपस्थित नसल्याचेही रुपनवरांनी स्पष्ट केले आहे.

ते पुढे म्हणाले की, दलतोडे यांनी आयोजन केलेल्या मेळाव्याला यशवंत सेना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचीत बहुजन आघाडी, असे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. तसेच दलतोडेंनी यावेळी पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्यावर केलेले आरोपही सर्व बिनबुडाचे व खोटे होते. ते पक्षातील लोकांची दिशाभूल करण्याचं षडयंत्र करत असून त्यांना यश मिळणार नाही, अशी टीकाही रूपनवरांनी केली.

दरम्यान, दलतोंडे यांनी बारामती येथे आजोजित केलेल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले होते. तसेच पक्षाचे नेतृत्वकडून कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप करत कंटाळून आम्ही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते.

याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभा राहिल्याने यापुढे पक्षावर आमचा हक्क असल्याचे सांगत आमचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले होते. यामुळे रासपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, यावर पुणे जिल्हाध्यक्ष रुपनवरांनी रासपची अधिकृत भूमिका मांडत दावा करणारे पदाधिकारी हे पक्षाचे नसल्याचे सांगत ते तोतया असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT