सातारा : आपले विधानसभेचे राजकारण शाबूत ठेवण्याचा प्रयत्न कोण करणार नाही? शिवेंद्रसिंहराजेंनी तेच केलं. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या जागी योग्य वाटतात. अर्थात ते रांजणे यांचा अर्ज मागे घेऊ शकले असते; पण त्यासाठी इतर जागांसाठी तडजोडीच्या चर्चा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तरी कुठं फोर्स केला? आपापल्या जागा पटकाविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार शशीकांत शिंदेंसाठी का रूमाल टाकला नाही, याचे उत्तर मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दडवून ठेवले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूक गाडीत काही धुरंधर नेत्यांनी आपल्या जागा पटकावल्यानंतर उरलेल्या जागा पकडण्यासाठी जी कळवंड लागलेली आहे, त्यात सर्वाधिक चर्चा आहे, ती जावळी सोसायटी मतदारसंघाची. तिथे आमदार शशिकांत शिंदे यांना ज्ञानदेव रांजणे यांनी दिलेलं आव्हान कायम कसं राहिलं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. खरेतर अखेरच्या क्षणी रांजणे यांचा अर्ज मागे घेतला जाईल, असा सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांचा व्होरा होता. मात्र, तसे घडले नाही. जेव्हा कधी असं आकलनापलीकडचं घडतं, तेव्हा त्या घटिताच्या मागे फार मोठ्या घडामोडी असतात. त्याच समजावून घेण्याचा प्रयत्न आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रांजणे यांच्या अर्जाचे अस्तित्व माघारीच्या दिवसापर्यंतच राहील, हा सर्वसामान्य समज खोटा ठरला असला, तरी स्वतः शशिकांत शिंदेही त्याच भ्रमात होते. रांजणे यांचा अर्ज मागे घेण्यात इतरांप्रमाणे आपल्यालाही यश येईल, हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. श्री. रांजणे यांच्या उमेदवारीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं असलेलं पाठबळ सर्वश्रुत आहे. रांजणे हे शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांनी सांगायचं आणि रांजणेंनी अर्ज मागे घ्यायचा इतकं सोपं हे गणित होतं. म्हणून आता रांजणे यांच्या राहिलेल्या अर्जाचा दोष देताना अनेक जण शिवेंद्रसिंहराजेंकडे बोट दाखवत आहेत.
वरकरणी हे खरं वाटत असलं, तरी तितकंस खरंही नाही. आपले विधानसभेचे राजकारण शाबूत ठेवण्याचा प्रयत्न कोण करणार नाही? शिवेंद्रसिंहराजेंनी तेच केलं. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या जागी योग्य वाटतात. अर्थात ते रांजणे यांचा अर्ज मागे घेऊ शकले असते; पण त्यासाठी इतर जागांसाठी तडजोडीच्या चर्चा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तरी कुठं फोर्स केला? आपापल्या जागा पटकाविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंसाठी रुमाल टाकला का? तसा तो टाकला असता, तर कदाचित शिवेंद्रसिंहराजेंना शिंदेंचा मार्ग मोकळा करून द्यावाच लागला असता.
कारण भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शाबूत राहणं, ही राष्ट्रवादीचीच कृपा होती. ...आणि त्या कृपेला शिवेंद्रसिंहराजे नक्कीच जागले असते; पण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदेंसाठी तसा प्रयत्नच झाला नाही आणि रांजणे हे राष्ट्रवादीचेच आहेत, हे ‘सत्य’ सांगून शिवेंद्रसिंहराजे मोकळे झाले. शशिकांत शिंदे यांना पक्षातूनच आडकाठी येण्यामागे जसे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतरचे आडाखे आहेत, तसेच काही जुने संदर्भही आहेत.
पहाटेच्या शपथविधीच्या दिवशी पक्ष सोडून निघालेल्या आमदारांना परत आणण्यासाठी धडपडणारे शशिकांत शिंदे त्या दिवशी उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले होते. असं सांगितलं जातं, की त्या प्रसंगानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिंदेंवर खप्पामर्जी झाली आहे. रांजणे यांची उमेदवारी संपुष्टात न येण्याला हाही एक संदर्भ आहे. पहाटेच्या शपथविधीदिवशी पक्षाध्यक्षांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून शिंदे यांनी मोठी चूकच केली का? ती आता त्यांना भोवते आहे का?
राज्यात परिवर्तन घडविलेल्या साताऱ्याच्या पावसातील सभेची चर्चा दीर्घकाळ चालू राहणं, हे क्रमप्राप्तच होतं. तशी ती सभा अजूनही चर्चेत असतेच; पण मुंबईत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी ही सभा घडविण्यामागचं बहुतांश श्रेय शशिकांत शिंदे यांना देऊन टाकणं, श्री. शिंदे यांनीही त्या सभेचे रसभरीत वर्णन करणं सातारा जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणाला रुचणारं नव्हतं. त्याचेच उट्टे आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने काढले जात आहेत का?
पावसातल्या या सभेनंतर झालेल्या निवडणुकीत शिंदे यांचा कोरेगावातून पराभव झाला. त्यामागे कोणकोण होते हे आता जनतेपासून लपून राहिलेले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊनही शिंदे यांचा पराभव शरद पवार यांच्या जिव्हारी लागला. शिंदेंना विधान परिषदेवर घेऊन त्यांनी ही जखम भरून काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात इतक्या तातडीने शिंदे पुन्हा आमदार होणं हे पक्षातल्या नेत्यांना पचणार होतं का? शिंदेंना जिल्हा बँक इथेही नडते आहे. शिवाय, पक्षाध्यक्षांचा एवढा विश्वासू असलेला हा नेता निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीतही बसू शकतो, ही अनाहूत भीतीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना होतीच.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने राष्ट्रवादी ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन पार्ट जिल्ह्यातल्या लोकांना सरळसरळ पाहायला मिळाले. काही उमेदवाऱ्यांसाठी वरिष्ठ पातळीवरून अजित पवारांनी धरलेला आग्रह असो, काही जणांसाठी आवश्यकता असूनही न धरलेला आग्रह असो किंवा पक्षाध्यक्षांचा ठरलेला दौरा रद्द होणे असो या साऱ्या घडामोडींसाठी वरिष्ठ पातळीवरून जशा हालचाली सुरू होत्या, तशीच जिल्ह्यातूनही एक शक्ती कार्यरत होती. पवारांचा ठरलेला सातारा दौरा झाला असता, तर उमेदवाऱ्यांचे चित्रही वेगळे पाहायला मिळाले असते. त्यामुळे यातला ‘अ’ आणि ‘ब’ पार्ट लोकांना उघडपणे दिसला. या विभागणीतही शशिकांत शिंदे जिल्हांतर्गत राजकारणात एकाकी पडण्याची कारणे दिसून येतात.
शिंदे यांनी अलीकडच्या काळात जावळी विधानसभा मतदारसंघात लक्ष घातल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे संतप्त झाले आणि त्यांनी रांजणेंना उभे केले, असे राष्ट्रवादीचे नेते आता खासगीत बोलत आहेत; पण शशिकांत शिंदेंनी भाजप आमदाराच्या जावळीत लक्ष घालणे, हे पक्षवाढीचं काम नाही का? जिल्हा बॅंकेसाठी त्यांच्याशी इतर तडजोडी करताना तुम्ही शिंदेंच्या बाबतीत शिवेंद्रसिंहराजेंना शब्द टाकू शकला नसता का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांच्याकडे नाहीत.
अर्थात, शिंदे हे असे अचानक एकाकी पडले आहेत, असेही म्हणता येणार नाही. फार पूर्वीपासून ही प्रक्रिया सुरू होती; पण शिंदे गाफील राहिले. राजकारणात केवळ पक्षनिष्ठा कामाला येते, हे गृहित धरण्याची चूक त्यांनी केली. त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ असलेल्या जावळीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांची नाकाबंदी केलीय. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपला दबदबा निर्माण केलाय आणि आता इथे जिल्हा बँकेत घरच्यांनीच घेरलेय... संघर्षातून उभे राहिलेले शिंदे जिल्हा बँकेत काही जादू घडविणार का आणि एकूणच हा चक्रव्यूह कसा भेदणार हे पाहणे आगामी काळात रंजक ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.