Satara News, 18 June : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याचं प्रकरण चांगलंच पेटलं आहे. विरोधकांनी पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता अकोल्यातील या प्रकरणाच्या झळा साताऱ्यापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. कारण नाना पटोलेंनी (Nana Patole) ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली आहे.
या प्रकरणावर बोलताना कदम म्हणाले, अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण काँग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला असून गांधी घराण्यातील नेतापूजनाची परंपरा आता पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकडून पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा, अशा शब्दात धैर्यशील कदम यांनी पटोलेंचा समाचार घेतला.
धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam) म्हणाले, देशाच्या राजकारणात काँग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले आहेत. याच परंपरेचा शिरकाव काँग्रेसमध्ये तळागाळापर्यंत पोहोचला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला.
तर अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही. अशा शब्दात धैर्यशील कदम यांनी पटोलेंवर घणाघात केला. तसेच पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही कदम यांनी पटोलेंना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.