AMC
AMC Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर महापालिका मागील काही वर्षांपासून दिवाळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला सात हजार रुपये सानुग्रह अनुदान देत आहेत. कोरोना संकटात महापालिका कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्यामुळे अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने सानुग्रह अनुदान वाढवून मिळण्याची मागणी केली होती.

अहमदनगर महापालिकेच्‍या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्‍त बोनस, सानुग्रह अनुदान, थकीत देणे दिवाळी पूर्वी मिळणे बाबत महापालिका कामगार संघटनेने मागणी केली होती. या संदर्भात महापौर रोहिणी शेंडगे यांनी आज महापौर कार्यालयामध्‍ये बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या प्रसंगी स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती पुष्‍पा बोरूडे, नगरसेवक श्याम नळकांडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप पठारे, मुख्‍यलेखाअधिकारी प्रदीप मानकर, आस्‍थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, कामगार संघटनेचे अध्‍यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर शेंडगे म्हणाल्या की, गेल्‍या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. कोरोनाच्‍या काळात देखील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. असे असताना देखील महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नागरी सुविधा चांगल्‍या प्रकारे देत आहे. कामगार युनियनने दिवाळी सणा निमित्‍त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व थकीत देणे देण्‍याबाबत मागणी केली होती.

याबाबत कामगार युनियन पदाधिकारी, प्रशासन व पदाधिकारी यांची बैठक घेवून बैठकीमध्‍ये सर्वानुमते निर्णय घेण्‍यात आला. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्‍हावी यादृष्टीने महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्‍हणून 8 हजार 500 रुपये व सहाव्‍या वेतन आयोगाती फरकापोटी एक हप्‍ता देण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला. तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे दिवाळी अडव्‍हान्‍स देखील मिळणार आहे. सर्व रक्‍कम कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्‍या 15 दिवस आधी देण्‍याच्‍या दृष्टिने कार्यवाही करण्‍याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत त्‍यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

अविनाश घुले म्‍हणाले की, कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. पदाधिकारी, प्रशासन व कामगार युनियन सगळ्यांनी आपले विचार मांडले परंतु यातून तोडगा काढणे आवश्‍यक आहे. महापौर शेंडगे व आम्‍ही पदाधिकारी मिळून एक चांगला निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी देखील यापुढील काळात अधिक जोमाने काम करावे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी नक्‍कीच गोड होणार आहे.

अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप पठारे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी प्रमाणे यावर्षी 7 हजार रुपये सानुग्रह अनुदान व कर्मचाऱ्यांच्‍या थकीत देणेपैकी काही रक्‍कम देण्‍याबाबत सु‍चविले होते. परंतु कामगार युनियनची मागणी व प्रशासनाची भुमिका यामध्‍ये तोडगा महापौर व पदाधिकारी यांनी काढला. ही रक्‍कम कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्‍याचा निश्‍चित प्रयत्‍न करण्‍यात येईल असे ते म्‍हणाले.

कामगार युनियनचे अध्‍यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी बैठकीमध्‍ये सांगितले की, आमची मागणी कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणे बाबत होती. तसेच थकीत देणे देखील देणबाबत मागणी केली होती. कोरोनाच्‍या काळात सर्वांनी चांगले काम केले आहे. कर्मचाऱ्यांची देणी भरपूर आहेत. महापौर व पदाधिकारी यांनी योग्‍य निर्णय घेवून 10 ते 11 हजार रुपये सानुग्रह अनुदान दयावे अशी मागणी केली होती. परंतु महापौर, पदाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी कर्मचा-यांसाठी 8 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान व सहाव्‍या वेतन आयोगाचा एक हप्‍ता देण्‍याचे मान्‍य करून कर्मचाऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT