Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांचे मौन असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

अमित आवारी

अहमदनगर - राज्यात सध्या केतकी चितळे, राणा दाम्पत्य, अॅड. गुणरत्न सदावर्ते आदींवर कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली. ( Due to Sharad Pawar's silence, the NCP workers are angry )

राम शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे. असा आरोप राम शिंदे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका येते असे शिंदे यांनी सांगितले.

आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पोलिस यंत्रणेस वेठीला धरून सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटिल डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे.

पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता दहशतवादास सामोरे जाणाऱ्यांवरच कारवाई केली जात असल्याने, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते, असा आरोप त्यांनी केला.

शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे. मात्र कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो. 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा. खैरनार यांच्यासारख्या अधिकाऱ्याने प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम उघडूनही विचलित न होता शांत राहणाऱ्या पवार यांच्यावर एका अभिनेत्रीने केलेल्या टीकेमुळे राज्याची कायदा सुव्यवस्था वेठीस धरण्याच्या हालचाली याच वैफल्यातून दिसून येते. पोलिसांना हाताशी धरून त्याची योजनाबद्ध कार्यवाही सुरू असल्याचा संशयही राम शिंदे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT