Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Sharad Pawar-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघामुळे महाआघाडीत होणार बिघाडी?; भाजप देणार नवखा उमेदवार

तात्या लांडगे

सोलापूर : दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर मध्य या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची ताकद मोठी आहे. मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी स्ट्राँग आहे. काँग्रेसच्या वाट्याला सध्या विधानसभेचे तीन मतदारसंघ असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ देखील जागा वाटपात काँग्रेसलाच देण्यात आलेला आहे. या मतदारसंघात ४६ वर्षे काँग्रेसचा खासदार राहिला. पण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा दोनदा पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भाकरी फिरविण्याची मागणी केली आहे. पण, ही मागणी आघाडीत बिघाडीचे प्रमुख कारण ठरू शकते. (Due to Solapur Lok Sabha Constituency, there will be a breakdown in Mahavikas Aghadi?)

सोलापूर (Solapur) लोकसभेची जागा २०१४ च्या मोदी लाटेत भाजपच्या (BJP) ताब्यात गेली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही तो मतदारसंघ भाजपने स्वत:कडे राखण्यात यश मिळवले. या पार्श्वभूमीवर वय वाढत असल्याने नवीन कार्यकर्त्यांना आता संधी मिळावी, या हेतूने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) हातून निसटलेला सोलापूर लोकसभेचा मतदारसंघ पुन्हा विरोधकांच्या तावडीतून सुटावा; म्हणून आमदार रोहित पवारांनी जनतेची मागणी असल्याचे सांगत भाकरी फिरविण्याची खरोखर वेळ आल्याची खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापुढेच व्यक्त केली. त्यामुळे शिंदेंच्या राजकीय निवृत्तीमुळे पुढचा उमेदवार कोण आणि भाकरी फिरविण्याच्या रोहित पवारांच्या मागणीमुळे हा मतदारसंघ कोणाकडे राहणार, अशा दोन प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार स्व. भारत भालके यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली आणि विजय मिळवला होता. काँग्रेसचा तो विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडेच आहे. त्याबदल्यात अजूनही काँग्रेसला दुसरा मतदारसंघ मिळालेला नाही. ही खंत मनात असतानाच आता लोकसभेची जागा आम्हाला द्या, अशी राष्ट्रवादी नेत्यांची मागणी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी निर्माण करू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एकाच उमेदवाराला मतदार सतत स्वीकारत नाहीत

काँग्रेसकडून सूरज रतन दमाणी आणि सुशीलकुमार शिंदे यांना मतदारांनी तीनदा खासदार होण्याची संधी दिली. तसेच गंगाधर कुचन, धर्मण्णा सादुल यांना प्रत्येकी दोनवेळा स्वीकारले. तर मडेप्पा काडादी यांनी दोनदा निवडणूक लढविली, पण एकदाच विजय मिळाला. शिंदे यांनी तब्बल पाचवेळा सोलापूर लोकसभा निवडणूक लढविली, पण त्यांना दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसरीकडे, भाजपने लिंगराज वल्याळ यांना चारवेळा, तर ॲड. शरद बनसोडे यांना दोनदा उमेदवारी दिली होती. त्यांना एकदाच खासदार होण्याची संधी मिळाली. या मतदारसंघात १९५२ नंतर आजपर्यंत तब्बल ४६ वर्षे काँग्रेसने राज्य केले आहे. पण, एकाच उमेदवाराला मतदार सतत स्वीकारत नाहीत, असेही याठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे मतदारसंघाचा पूर्व इतिहास पाहता भाजप व काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेचे उमेदवार नवखेच असणार हे निश्चित मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT