Shashikant Shinde, Sharad Pawar
Shashikant Shinde, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

या तीन चुकांमुळे शशीकांत शिंदेंचा झाला पराभव....

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटीतून आमदार शशीकांत शिंदे यांचा एका मताने नवखा उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. या पराभवाची कारणमिमांसा करताना आमदार शिंदे यांनी निवडणुकीत आपण गाफिल राहिल्याचे कबुल केले. पण, त्यासोबतच त्यांच्याकडून तीन चुका झाल्या. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शिंदे म्हणाले, ''मी पराभव स्वीकारला आहे. सुरवातीला माझ्याकडे ३२ मते होती. दीपक पवार यांच्याकडे चार मते होती. उर्वरितांकडेही काही मते होती. त्याची बेरीज ४९ होती. मी शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील आमची बैठक झाली. त्यावेळी मी जावळीतून लढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर माझ्यासोबत २७ जण येण्यास तयार झाले. पण, जिल्ह्यातील नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार सहकार्य करण्याचे ठरल्याने हे मतदार पुन्हा घरी पाठविले. तेथेच माझी पहिली चूक झाली.

त्यानंतर माझ्याकडे १७ ते १८ मते होती, ती निवडणुकीपर्यंत मी २४ पर्यंत नेली. हा माझा नैतिक विजय आहे. आता आमच्यातील फुटले की बाहेरच्यातील हे समजले नाही. मतदारांसाठी मी अगदी गोवा, तिरुपती, मैसूर, उटी, विशाखापट्टणम्‌ आणि गणपतीपुळे पर्यत गेलो. मनात आले असते तर मी सगळ्यांना ताब्यात घेतले असते. अजित पवारांच्या सोबतच्या पुण्यातील बैठकीतही शशिकांत शिंदे जावळीतून लढतील, असे सांगितले होते. तसेच पवार साहेबांनीही रामराजे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजेंना संपर्क करून शशिकांत शिंदेंना मदत करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे मी पक्ष व पॅनेलच्या चौकटीच्या बाहेर आलो नाही, ही दुसरी चूक झाली.

तेथेच माझा विश्वासघात झाला. ज्यांनी जबाबदारी घेतली होती, त्यांनी मनापासून जावळीतील त्या उमेदवाराला मागे घेण्यास सांगितले का, त्या कार्यकर्त्यांना ताणत नेण्याचा प्रयत्न कोणी केला. सातत्याने बैठक घेण्याचे आश्वासन देत बैठक दहा ते १५ दिवस लांबवली. येथेच मला शंका आली होती. पॅनेल करून निवडणूक लढायची असे सांगून माझी फसगत केली. एकीकडे चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला फसगत करायची या भूमिकमुळे मी अडचणीत आलो.

निकालानंतर पडद्यामागील अनेकजण विजयात सहभागी झाले. मात्र, या कटाचा सूत्रधार कोण हे माहिती व्हावे, म्हणून बोलत आहे. पॅनेल उभे राहिले. पक्ष विरहित होते, मग पक्षाचे तीन मोहरे कसे पडले,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पक्षाच्या बैठकांसाठी मी पाटण, जावळी, माणमध्ये लक्ष घातल्याने सगळ्यांना अंगावर घेण्याची चूक मी केली का, पॅनेलच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी कोणी प्रयत्न का केले नाहीत?

नंदकुमार मोरेंच्या विरोधातील उमेदवार विजयी होतो, याच्या मागे कोण होते, याचा नेत्यांनी शोध घ्यावा. सातारा तालुक्यात सर्वाधिक मते असूनही पक्षातील कार्यकर्त्याला डावलून मित्राला उमेदवारी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याची जादूची कांडी फिरली अन्‌ विरोधी उमेदवार बिनविरोध झाले. जावळीतील माझा हस्तक्षेप वैयक्तिक स्वार्थ नव्हता. पण मला राजकाणारतून कोणी उद्धवस्त करत असेल मी गप्प बसणार नाही.

भविष्यात या गोष्टी गांभीर्याने घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करणार आहे. पवार साहेब व पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन मी कोणतेही काम करणार नाही. जिल्ह्यातील नेत्यांनी सध्याची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी. शशिकांत शिंदे पराभूत झाला यामागे शंभर टक्के शिवेंद्रसिंहराजे जबाबदार आहेत, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. याच्या मागे त्यांचेच षडयंत्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी राजा नसल्याने बिनविरोध नाही...

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्व राजे बिनविरोध झाले, पण आमदार शशिकांत शिंदे बिनविरोध होऊ शकत नाही, यावर आमदार शिंदे म्हणाले, की कारण मी राजा नाही, त्यामुळे मी बिनविरोध होऊ शकत नाही.

तेव्हा अभयसिंहराजेंमुळे निवडून आलो...

काही लोक माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन का भीती घेतात माहित नाही. मी कोणालाही त्रास दिलेला नाही. मी विरोधातही उघड काम करतो. माझ्या कामामुळे मला पक्षाने आमदार व मंत्री केले. मनात आणले असते तर बॅंकेत मागील दहा वर्षातच अध्यक्ष झालो असतो. १९९९ मध्ये मी जावळीतून उभा राहिलो, निवडून आलो ते कै. अभयसिंहराजेंमुळेच. याची मी आजही जाणीव ठेवली आहे. पण, काहींनी ही जाणीव ठेवली नाही, हे दुर्दैव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT