Disley Guruji, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर फिरली सूत्र

Ranjitsinh Disale | Global Teacher | शिक्षणाधिकाऱ्यांनाही समज दिली असल्याची माहिती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांचा राजीनामा नामंजूर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोबतच मुख्याधिकाऱ्यांनी देखील शिक्षणाधिकाऱ्यांना रणजितसिंह डिसले प्रकरणी माध्यमांमध्ये अथवा बाहेर कोठेही काहीही वाच्यता न करण्याच्या लेखी सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. (Global Teacher Ranjitsinh Disale Latest News)

रणजितसिंह डिसले यांनी ४ दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यावेळी डिसले यांनी भावुक होऊन अधिकाऱ्यांच्या विशेषत: प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या त्रासाबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर ‘तुम्ही निश्चिंत राहा, काही कारवाई होणार नाही, राजीनामा मागे घ्या,’ असे सांगून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.

जवळपास ३४ महिने कामावर गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे कारण देत सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांनी डिसले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे डिसले यांना राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्यावरील कारवाई सुरूच राहणार असल्याने अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय देण्याची विनंती केली होती.

का होत आहे कारवाई

डिसले यांना पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी रजा मिळावी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी रजेसंदर्भात शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी लोहार यांची भेट घेतली. यात पीएच.डी. रजा मिळविण्यासाठी मोठी नियमावलीच त्यांना सादर केली. तसेच रजा मिळविण्यासाठी शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती सादर करायला लावली होती.

डिसले हे ३४ महिने कामावर हजर नव्हते असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होऊन त्याचा अहवाल लोहार यांनी तयार करून डिसले यांच्यावर कारवाई करण्याचे निश्चित केले. डिसले यांनी ७ जुलैला राजीनामा नोटीस दिली आहे. त्यानंतर एका महिन्यानी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होणार होता. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई होणारच असे लोहार यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT