Dhairyashil Mane-Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे आठ तासांत उत्तर : शिवसैनिकांनी मोर्चा काढलेल्या खासदाराच्या घरी दिली भेट

खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या निवासस्थानी शिंदे पोहोचले.

संभाजी थोरात

कोल्हापूर : शिवसेनेतून बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक दौऱ्यात बदल करून खासदार माने घरी नसताना देखील त्यांच्या घरी भेट देऊन मी तुमच्या पाठीशी आहे असा संदेश देत, मोर्चेकऱ्यांना शह दिला आहे.

धैर्यशील माने यांच्या घरावर आज सकाळी मोर्चा काढत त्याना जाब विचारण्याचा प्रयत्न हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काही शिवसैनिकांनी केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हा मोर्चा थांबवला, मात्र या मोर्चावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. शिवसेनेचे बंडखोर आमदार किंवा खासदार यांच्या विरोधात निघालेला हा पहिलाच मोर्चा होता. त्यामुळे त्याची राज्यात जोरदार चर्चा झाली. खुद्द माने यांनी मोर्चेकऱ्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे सांगत आपल्या समर्थकांनाही तसे आवाहन केले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी कोल्हापूर येथे पोहोचले. त्यांना मानणाऱ्या खासदाराच्या विरोधात निघालेल्या मोर्च्याबाबत ते काय बोलणार, याची उत्सुकता होती. त्याच वेळी स्वतः धैर्यशील माने हे दिल्लीत होते. दिल्लीत आज माने यांनी शिंदे यांची भेटही घेतली. माने हे दिल्लीत असताना थेट माने यांच्या रुईकर कॉलनीतील घरी भेट दिली. यावेळी धैर्यशील यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांची भेट घेतली. सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा निघाला आणि आठ तासांच्या आत शिंदे यांनी त्यास उत्तर दिले, असे या भेटीतून दिसून आले.

दौऱ्यात अगदी कमी वेळ असताना देखील केवळ आपल्या समर्थकांच्या मागे आपण आहोत हे दाखवण्यासाठीच मुख्यमंत्री तेथे गेले हे स्पष्ट आहे. मोर्चात किती लोक होते ते पाहिलं याविषयी मला बोलायचं नाही, अस म्हणत प्रतिक्रिया देणंही टाळलं.

शिवसेनेचे कोल्हापूरात दोन खासदार आहेत. दोघांनीही बंडखोरी करत शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मात्र शिवसेनेने मोर्चा फक्त माने यांच्याविरोधात काढला. दुसरे खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात मात्र कोणी काही बोलले नाही. माने व मंडलिक या दोघांचे निवासस्थान हे रूईकर काॅलनीतच आहे. तरीही मंडलिक यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचे धाडस कोणी दाखवले नाही, याचीही चर्चा कोल्हापूरात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT