Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde's Big Announcement : एकनाथ शिंदेंची सांगोल्यासाठी मोठी घोषणा; ‘तुम्ही मला जागा द्या; उद्योगमंत्र्यांना सांगून तुम्हाला....’

Sangola MIDC Issue : पालकमंत्री गोरे आपण सांगोल्याच्या एमआयडीसाठी पाठपुरावा करावा. आमदार आहेत, तेही पाठपुरावा करतील, त्यामुळे आपले महायुती सरकार हे कारणं देणारं नाही तर ऑन दी स्पॉट निर्णय घेणारे हे सरकार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 April : सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी मोठी घोषणा केली आहे. ‘तुम्ही जागा दिली, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांना मी सांगेन की, सांगोल्यात एमआयडीसी झाली पाहिजे. पालकमंत्री जयकुमार गोरे आपण सांगोल्याच्या एमआयडीसाठी पाठपुरावा करा. आमदार आहेत, तेही पाठपुरावा करतील. आपले महायुती सरकार कारणं देणारं नाही, तर ‘ऑन दी स्पॉट’ निर्णय घेणारे हे सरकार आहे, असेही शिंदे यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सध्या सर्वच क्षेत्रांत पुढे असून ते सध्या एक नंबरला आहे. मुख्यमंत्री असताना मी जेव्हा दोन वेळा दाओसला गेलो, त्या वेळी साडेसात ते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. आता देवेंद्र फडणवीस दाओसला गेले, त्यांनी १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. त्यातून पंचवीस ते तीस लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.

परवा आम्ही मुंबईत गुंतवणुकीसंदर्भात कार्यक्रम घेतले. खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे आपला महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झाले आहे. उद्योग आले, तरच लोकांना रोजगार मिळणार आहेत. इथं (सांगोला) एमआयडीसी आहे की नाही, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे पाहत केली. शहाजीबापू पाटील आपल्याकडे एमआयडीसी आहे का नाही, असे विचारले.

तेव्हा व्यासपीठावरील लोकांनी सांगोल्यात नाही, पंढरपुरात आता झाली आहे, असे स्पष्ट केले. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जर तुम्ही जागा दिली, तर एमआयडीसीही सांगोल्यात झाली पाहिजे, असे मी उद्योग मंत्री उदय सामंत यांना सांगेन. पालकमंत्री गोरे आपण सांगोल्याच्या एमआयडीसाठी पाठपुरावा करावा. आमदार आहेत, तेही पाठपुरावा करतील, त्यामुळे आपले महायुती सरकार हे कारणं देणारं नाही तर ऑन दी स्पॉट निर्णय घेणारे हे सरकार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शहाजीबापूंना मी मोकळं ठेवणार नाही

शहाजीबापू, आपण जरी पराभूत झाला तर तुमची जबाबदारी संपलेली नाही. लोकांमध्ये अजूनही तुमच्याबद्दल क्रेझ आहे. खरी लढाई आता सुरू झाली आहे. मी पक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही पक्षवाढीचं काम करताय. आपली महायुती आहे, त्यामुळे महायुती मजबूत करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत. शहाजीबापू पाटील यांना मी मोकळं ठेवणार नाही, त्यांनाही मी जबाबदारी देणार आहे.

विमानात बसेपर्यंत तुम्हाला 50 लाख मिळतील

सांगोल्यातील आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मी मुख्यमंत्री असताना दोन कोटी दिल्याचे सांगण्यात आले. पण, ते माझ्या लक्षातही नाही. उजव्या हाताने दिलेले मी डाव्या हाताला कधी कळू देत नाही, असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, इथे एक चिठ्ठी आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पन्नास लाख रुपये पाहिजे, अशी शहाजीबापूंची मागणी आहे. त्यावर शहाजीबापूंकडे पाहत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काय पन्नास लाख रुपये पाहिजेत का? बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत आणि त्यांच्यामुळेच आपण सरकार चालवतोय, त्यामुळे मी इथून विमानात बसेपर्यंत पन्नास लाखांच्या मंजुरी तुमच्याकडे येईल, असा शब्दही शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT