Shahajibapu Patil, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : "मी भिताड आहे का पूल?" पराभवानंतर शहाजीबापू पहिल्यांदाच बोलले, ठाकरेंचा घेतला समाचार

Shahajibapu Patil News : विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं आहे. भाजपनंतर राज्यात सर्वाधिक जागा शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिंदेंच्या बंडाला भक्कम साथ देणारे सांगोल्याचे 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल' फेम शहाजीबापू पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

Jagdish Patil

Sangola Assembly News, 28 Nov : विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं आहे. भाजपनंतर राज्यात सर्वाधिक जागा शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाला भक्कम साथ देणारे सांगोल्याचे 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल' फेम शहाजीबापू पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

हा पराभव शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवाय या निकालामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. मात्र, याच नाराजीवर मात करण्यासाठी पाटील पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. कारण पराभूत झालेल्या शहाजीबापूंनी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली आहे.

मुंबईतून परत येताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारं भाषण केलं आहे. खरंतर शहाजीबापू यांनी मुंबईतून परतताच आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने बैठकीचं रूपांतर जाहीर सभेत झालं.

त्यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर शहाजीबापूंनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना शहाजीबापू म्हणाले, "माझा पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? पराभवामुळे खचायला मी काय भिताड किंवा पूल आहे का? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भोंगा संजय राऊत इथे त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडण्यासाठी आले होते.", असं म्हणत त्यांनी ठाकरेंसह राऊतांवर हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी राऊतांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, खोटारड्या संजय राऊतांचं महाराष्ट्रातील जनता कधीच ऐकणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि शहाजीबापूला शिव्या दिल्याशिवाय राऊतांना अन्न गोड लागत नाही. त्यामुळे संध्याकाळी भाकरी खाताना एका खोलीत स्वत:ला बंद करून आधी आम्हाला शिव्या देतात.

त्यानंतर मग बायकोला भाकरी दे असं सांगतात", अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. दरम्यान, यावेळी त्यांनी आमदारकीपेक्षा मोठं काहीतरी घेऊन येतो, असं आश्वासन कार्यकर्त्यांना दिलं. ते म्हणाले, "पराभवाने खचू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठं कायतरी घेऊन येऊन दाखवतो, त्यामुळे आता तुम्ही रुबाबात राहा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT