Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना या अटींवर विठ्ठलाची महापूजा करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

अरविंद मोटे

सोलापूर : ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर राज्यातील नगरपलिका निवडणुका जाहीर होत आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या महापूजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही योजना, विकासनिधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. (Election Commission gave permission Chief Minister Vitthal's mahapooja on some conditions)

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी (ता. २१ जून) राज्यात राजकीय भूकंपास प्रारंभ झाला. सरकार बदलण्याची चिन्हे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून सुरू झाल्याने श्री विठ्ठलाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार, असा प्रश्ना निर्माण झाला होता. अशातच शपथविधीनंतर या प्रश्नावर पडदा पडलेला असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

याबाबत जिल्हधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची महापूजा करता येणार आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही. मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्याच्या पूर्व नियोजित दौऱ्यात कोणाताही फरक झालेला नाही. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू असली तरी निवडणूक आयोगाने काही अटी घालून महापूजेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे महापूजा होईल, असे सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT