अकोले ( जि. अहमदनगर ) - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर असतो. आणि सामाजिक प्रश्न प्रश्न लोकशाही मार्गाने कसा सोडवावा याचे उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ग्रामसभेने समाजासमोर उभे केले आहे. ( Election for revival of well in Rajur: Queues were formed for voting )
राजूर ( ता. अकोले ) येथे पूर्वी पाण्याचा स्रोत महादेव मंदिराशेजारी असलेली घमांडी विहीर होती. नळयोजना बंद झाली, की या पाण्याचा वापर व्हायचा. कालांतराने या विहिरीत काही आत्महत्या झाल्या यातच विहिरीत कचराही होऊ लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सदस्यांनी ग्रामसभा घेऊन ही विहीर बुजविली होती. पाण्याची अवश्यकता व स्त्रोत पाहता या विहिरीची गरज भासू लागली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विद्यामान सदस्यांनी लोकांची मते जाणून घेतली. ही मते परस्पर विरोधी होती. त्यामुळे काल ( मंगळवारी ) पुन्हा ग्रामसभा घेऊन विहीर पुनरुज्जीवित करण्यासाठी चक्क मतदान घेऊन निर्णय जाहीर करण्यात आला. ग्रामसभेचा हा प्रयोग लोकशाहीचा सन्मान करणारा ठरला.
अकोले तालुक्यातील राजूर येथे विहिरीवरून ग्रामसभा झाली. घमांडी विहीर खोदायची की नाही, याबाबत चक्क मतदान घेण्याची वेळ आली. 26 जानेवारीच्या ग्रामसभेत घमांडी विहीर खोदण्याबाबतचा ठराव संतोष मुर्तडक यांनी मांडला होता. त्यावेळी प्रशासक दिनकर बंड यांनी, याबाबत 22 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे काल (मंगळवारी) मतदान झाले. पोलिस बंदोबस्तात सकाळी 11 ते 1 या कालावधीत मतदान घेण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क रांगा लावल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता.
निवडणुकीचा निकाल जाहीर करताना यावेळी माजी सरपंच गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, भास्कर येलमामे, संतोष मुर्तडक, काशिनाथ भडांगे, संतोष बनसोडे, शेखर वालझाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेमध्ये 516 ग्रामस्थांनी हजेरी लावली. विहीर उकरण्याच्या बाजूने 265 ग्रामस्थांनी मत नोंदविले, तर विरोधात 198 ग्रामस्थांनी मतदान केले. 53 मते बाद झाली. 67 मतांनी विहीर उकरण्याच्या बाजूचा विजय झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासक दिनकर बंड यांनी विहीर पुन्हा उकरून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर केले. त्यात विहीर खोदण्याच्या बाजूने असणाऱ्यांनी जल्लोष केला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर यांनी ठराव उपस्थितांना वाचून दाखविला. निवडणूक अधिकारी दिनकर बंड यांनी निकाल जाहीर केला. एक महिना सोशल मीडियावर जोरदार प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे तरुण वर्ग उपस्थित राहून मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात कोणतेही राजकारण आणू नये व कुणी श्रेय घेऊ नये. हा गावाचा निर्णय असल्याचे काशिनाथ भडांगे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.