Political party
Political party Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांचा 23 ऑक्टोबरनंतर धुराळा

दौलत झावरे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आगामी सहा महिन्यांत निवडणुकांचे रणधुमाळी राहणार आहे. या रणधुमाळीची सुरवात बाजार समित्यांच्या निवडणुकांपासून होण्याची शक्यता आहे. लवकरच विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आदींच्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होतील. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. Elections for market committees in Ahmednagar district are likely to start after October 23

या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात येऊन गेले. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे सुद्धा शिवसंपर्क अभियानातून पक्ष बांधणी करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनीही जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश दिले आहेत. भाजपमध्ये विखे पिता-पूत्रांसह आमदार मोनिक राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 12 बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे. या समित्यांना कोरोनामुळे मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे 23 ऑक्टोबरनंतर निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या कोरोना साथरोग परिस्थितीचा विचार करता, संसर्ग टाळण्याकरिता अनेक उपायांत सामाईक अंतर पाळणे महत्त्वाचे व आवश्‍यक होते.

राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका घेणे आवश्‍यक होते, अशा निवडणुका 22 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार 23 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश सरकारने दिला होते. नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव बाजार समित्यांच्या निवडणुका एक वर्षांपर्यंत पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास आहेत.

आता निवडणुका घेणे शक्य असल्याची शासनाची खात्री झाली असल्यामुळे 23 ऑक्टोबरनंतर राज्यातील निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राहुरी, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या बाजार समित्यांच्या निवडणुका 23 ऑक्टोबरनंतर होणार आहेत. नगर व पारनेर बाजार समितीची मुदत अद्याप संपलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT