Shivendraraje Bhosale,  Uday samant
Shivendraraje Bhosale, Uday samant sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : नवीन उद्योगांसह रोजगार निर्मिती होणार; शिवेंद्रसिंहराजेंची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा येथील वर्णे, निगडी येथील इच्छुक शेतकऱ्यांच्या पडीक, माळरान जमिनी योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून नवीन एमआयडीसी सुरु करणे तसेच नवीन उद्योग उभारून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीती करण्याला उद्योग मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी हिरवा कंदील दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्या मागणीनुसार उद्योग विभाग, एमआयडीसीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले आहेत.

सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात उद्योग खात्याचे सचिव, उद्योग विभाग व एमआयडीसीचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी यांच्यासोबत नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्यावतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्न, समस्या व विषय मांडले.

यावेळी मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ आदी उपस्थित होते. सातारा शहर व जिल्ह्यात सुमारे १३ औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित आहेत व ८ नवीन सुरू होणारी प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्यामुळे सातारा येथे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

केंद्र शासनाने सातारा जिल्ह्याकरिता १०० बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) हॉस्पिटल मंजूर केले असून त्यासाठी सातारा औद्योगिक क्षेत्रातील शासकीय पाच एकर जागा सदर हॉस्पिटल करीता देण्यात यावी, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार बैठकीत अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली.

सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये महावितरणचे नवीन उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून हे सबस्टेशन उभारणी साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये ६० आर जमीन तातडीने देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एमआयडीसीमधील रस्ते नुतनीकरण कामे पुढील महिन्यामध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या सातारा औद्योगिक क्षेत्रात उद्योग वाढीस जागा उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे बाहेर स्थलांतर करावे लागत आहे. सातारा औद्योगिक वसाहतलगतच्या निगडी व वर्णे गावातील अनेक शेतकरी पडीक व डोंगराळ जमीन औद्योगिक विकासाकरिता देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांची पडीक जमीन योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून औद्योगिक वसाहतीकरिता विकसित करावी, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

झालेल्या चर्चेनुसार निगडी व वर्णे गावच्या पडीक जमिनी अधिग्रहण करण्यासाठी महसूल विभाग व एम आय डी सी विभाग यांची संयुक्त बैठक संबधित शेतकरी यांचेसोबत आयोजित करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंत्री सामंत यांच्याशी सर्व विषयांवर चर्चा केली. बैठकीत झालेले सर्व प्रश्न आणि विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील असे असा शब्द त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT