शिराळा (जि. सांगली) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) शेतकरी विकास पॅनेलच्या मजूर संस्था गटातून सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh) हे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलमधून सोसायटी गटातून आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) हे बिनविरोध झाल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन भाऊंची एन्ट्री झाली आहे. सत्यजित देशमुख यांच्या विजयामुळे भाजपला आपले अस्तित्व सिद्ध करता आले, त्यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला आहे. (Entry of Satyajit Deshmukh and Mansingrao Naik in Sangli District Bank from Shirala)
शिराळचे राजकारण हे नेहमी वेगवेगळी वळणे घेणारे असते. या तालुक्यात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आतापर्यंत प्रत्येकजण आपापल्या सोयीचे राजकारण करत आले आहेत. सत्यजित देशमुख हे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तालुक्यात आघाडीचा धर्म पाळत ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदपर्यंतच्या सर्वच निवडणुकांत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक या दोन भाऊंच्या जोडीने कायम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र २०१९ मध्ये या दोन भाऊंच्या समीकरणात बदल झाला आहे. सत्यजित देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला अन् कट्टर विरोधक असणारे शिवाजीराव नाईक हे जवळचे सहकारी बनले, तर मित्रत्व जोपासणारे मानसिंगराव नाईक हे कट्टर विरोधक झाले आहेत.
जे दोन गट एकत्र येतील, त्यांचा विजय निश्चित हे शिराळच्या राजकारणाचे समीकरण होते. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी बाजी मारून बदलले. जो मजबूत तोच टिकेल, हे नवीन समीकरण आता तयार झाले आहे. सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक शिराळा तालुका भाजपच्या अस्मितेची व प्रतिष्ठेची होती. शिराळा तालुक्यातून विरोधक का असेना पण दोन भाऊ बँकेत गेले असल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.