Anna hazare
Anna hazare Eknath bhalekar
पश्चिम महाराष्ट्र

अण्णा हजारेंच्या आंदोलनात आता दिसणार माजी सैनिक

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : महाराष्ट्र राज्यात सक्षम लोकायुक्त असावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचे अल्टिमेटम दिले आहे. हजारे यांच्या या भूमिकेला माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथे पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचे एक दिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी पारनेर तालुक्यातील 70 गावांमधून प्रातिनिधीक स्वरुपात 75 माजी सैनिक उपस्थित होते. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास आणि पारनेर तालुका माजी सैनिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जमलेल्या माजी सैनिकांना संबोधित करताना अण्णा हजारे म्हणाले, मजबूत संघटनेशिवाय कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. समाजासाठी आजपर्यंत जे काही थोडेफार करू शकलो, ते संघटनेमुळेच. मात्र असे संघटन केवळ संख्यात्मक नको तर गुणात्मक असायला हवे. चारित्र्यशील लोकांचे संघटन झाले तर सरकारचे नाक दाबल्यास तोंड उघडायला वेळ लागणार नाही असे हजारे यांनी सांगितले.

हजारे पुढे म्हणाले की, माणसे आनंदासाठी धावपळ करीत असतात. पण ते आनंदाचा शोध बाहेर घेतात. खरा आनंद बाहेर नाही. तो आपल्या आतमध्येच असतो आणि तो केवळ निष्काम सेवेतून मिळतो. आमच्या देशात दरवर्षी 70 ते 80 हजार सैनिक निवृत्त होतात. तसेच महाराष्ट्रातून दरवर्षी 7 हजार सैनिक निवृत्त होतात. या सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही. प्रत्येक सैनिकाने निवृत्तीनंतर आपल्या गावासाठी योगदान दिले तर गावेही बदलायला वेळ लागणार नाही असा आशावाद हजारे यांनी व्यक्त केला.

राजकारणातून गावचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठी समाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले नेतृत्व पुढे आले पाहिजे.ते नेतृत्व निष्कलंक असायला हवे.तसेच समाजासाठी जगण्याची आणि समाजासाठीच मरण्याची तयारी अशा नेतृत्वाने ठेवायला हवी. हे काम एक माजी सैनिक नक्कीच करू शकतो असा विश्वास हजारे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आलेल्या सैनिकांनी आपापल्या गावासाठी योगदान देण्याचा आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सहभागी हेण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरसाळे यांनी केले. प्रकाश ठोकळ, महादेव लामखडे, राहूल गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मारुती पोटघन, राज्य सैनिक संघटनेचे नारायण अंकुशे व कॅप्टन विठ्ठल वराळ यांनीही यावेळी सैनिकांना मार्गदर्शन केले. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले तर नंदकुमार साठे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप पठारे, श्यामकुमार पठाडे, अन्सार शेख, रामदास सातकर यांनी सहकार्य केले.

माजी सैनिकांनी सैन्यात असताना देशासाठी योगदान दिले तसे निवृत्तीनंतर समाजासाठी योगदान द्यावे. देशातील माजी सैनिकांनी ठरवले तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही.

- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT